मँचेस्टर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने अफगाणिस्तानविरुद्ध षटकारांची बरसात केली. मॉर्गनच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानच्या समोर 397 धावांचा डोंगर उभा केला आहे.


कर्णधार मॉर्गनने शानदार खेळी करत केवळ 57चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने  71 चेंडूत 17 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 148 धावांची खेळी केली.  मॉर्गनने भारताचा सिक्सर किंग रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला.  रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची खेळी केली होती. त्या खेळीत त्याने 16 षटकार खेचले होते.

विशेष म्हणजे या सामन्याआधी मॉर्गनला दुखापत झाल्याची माहिती होती. तो या सामन्यात खेळेल की नाही याबाबत देखील साशंकता होती. मात्र त्याने कर्णधाराला साजेशी खेळी करत आज एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.

या सामन्यात षटकारांचा पाऊसच पडल्याचे दिसून आले. सामन्यात इंग्लंडकडून तब्बल 25 षटकार ठोकले गेले. यातील 17 षटकार एकट्या मॉर्गनने ठोकले तर मोईन अलीने देखील शेवटी येत चार षटकार ठोकले. बेअरस्टोनं देखील तीन षटकार ठोकत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

मॉर्गनसह जॉनी बेअरस्टोनं 90 तर ज्यो रुटनंही 88 धावांची खेळी उभारली. त्यामुळे इंग्लंडला 50 षटकांत सहा बाद 397 धावांचा डोंगर उभारता आला. यंदाच्या विश्वचषकातली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 44 धावांच्या सलामी भागीदारी नंतर विन्स 26 धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूटच्या साथीने बेअरस्टोने डाव सांभाळला. या दोघांनी 120 धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करणारा बेअरस्टो शतकाला मात्र मुकला. तो 90 धावांवर बाद झाला.