मँचेस्टर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने अफगाणिस्तानविरुद्ध षटकारांची बरसात केली. मॉर्गनच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानच्या समोर ३९७ धावांचा डोंगर उभा केला आहे.कर्णधार मॉर्गनने शानदार खेळी करत केवळ 57चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने  71 चेंडूत 17 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने १४८ धावांची खेळी केली.


मॉर्गनसह जॉनी बेअरस्टोनं 90 तर ज्यो रुटनंही 88 धावांची खेळी उभारली. त्यामुळे इंग्लंडला 50 षटकांत सहा बाद 397 धावांचा डोंगर उभारता आला. यंदाच्या विश्वचषकातली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.  अफगाणिस्तानचा अनुभवी गोलंदाज राशीद खान सर्वाधिक महागडा ठरला. इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्या नऊ षटकांत तब्बल 110 धावा कुटल्या.

नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ४४ धावांच्या सलामी भागीदारी नंतर विन्स २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूटच्या साथीने बेअरस्टोने डाव सांभाळला. या दोघांनी 120 धावांची भागीदारी केली.  बेअरस्टोचे शतक मात्र हुकले. 90 धावांवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला.

रूटचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर मॉर्गनने  तुफानी फटकेबाजी करत केवळ 57 चेंडूत शतक ठोकले. इतकेच नव्हे तर त्याने तब्बल 17 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 71 चेंडूत 148 धावांची खेळी केली. मोठा फटका खेळताना रूट आणि मॉर्गन दोघेही एकाच षटकात माघारी परतले.

त्यानंतर मोईन अलीने चार षटकार आणि एक चौकार खेचत केवळ 9 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आणि संघाला 50 षटकात सहा बाद 397 धावांची मजल मारून दिली.

इंग्लंडनं चार सामन्यांमध्ये तीन विजयासह सहा गुणांची कमाई केली आहे. त्या सहा गुणांसह विश्वचषकाच्या गुणतालिकेत इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. आता अफगाणिस्तानला हरवून उपांत्य फेरीच्या दिशेनं पाऊल टाकण्याचा इंग्लंडचा प्रयत्न राहिल. अफगाणिस्तानला यंदाच्या विश्वचषकात पहिल्या चारपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही.