मुंबई : भारताने पाकिस्तानला विश्वचषकात धूळ चारल्यानंतर पाकिस्तान संघावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. पाकिस्तानचा माजी कसोटीवीर शोएब अख्तरनं भारताविरुद्धच्या पराभवाचं खापर कर्णधार सरफराज अहमदच्या डोक्यावर फोडलं आहे. शोएब अख्तरनं सरफराजला ‘मूर्ख कर्णधार’ असं म्हटलं आपला संताप व्यक्त केला आहे. शोएबने हा व्हिडीओ युट्युब वर पोस्ट केला आहे.


अख्तरच्या मते पाकचा संघ धावांचा पाठलाग करण्यास सक्षम नसताना सरफराजनं घेतलेला निर्णय मूर्खपणाचा होता. तुमची भक्कम बाजू ही फलंदाजी नसून गोलंदाजी आहे. असं असताना सरफराजनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय अख्तरला चुकीचा वाटतो. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये ज्या चुका विराटनं केल्या त्याच चुका सरफराजनं केल्याचंही अख्तरनं म्हटलं आहे.

भारताने पाकिस्तानविरुद्ध विजयी परंपरा कायम ठेवत विश्वचषकात सातव्यांदा पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानसमोर 337 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. पण या लक्ष्याचा पाठलाग करण्यास पाकिस्तानी फलंदाजांना अपयश आलं. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव झाला.

पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान 35 व्या ओव्हरमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. त्यानंतर सामना सुरु झाला त्यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानसमोर 40 षटकांत 302 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. म्हणजे अवघ्या 5 षटकांत पाकिस्तानला 136 धावांचं अशक्य आव्हान मिळालं होतं.