SA vs AUS, WT20 Final : दक्षिण आफ्रिका येथील प्रसिद्ध अशा केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर महिला T20 विश्वचषक (Womens T20 WC) 2022 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु या सामन्यात टॉस जिंकत ऑस्ट्रेलियन महिलांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चांगली गोलंदाजी केली, पण ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनी हिने एकहाती झुंज देत नाबाद 74 धावा करत संघाची धावसंख्या 156 धावांपर्यंत पोहोचवली. ज्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 120 चेंडूत 157 धावा करायच्या आहेत.






ऑस्ट्रेलियासमोर दक्षिण आफ्रिकेची सलामीची जोडी मोठी अडचण


दक्षिण आफ्रिकेची सलामीची जोडी महिला टी-20 विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक यशस्वी ठरली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात हीच जोडी ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढवू शकते. दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघातील लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स ही सलामीची जोडी महिला टी20 विश्वचषकात आतापर्यंतची सर्वात यशस्वी जोडी ठरली आहे. या सलामीच्या जोडीने T20 विश्वचषकात डावाची सुरुवात करताना सर्वाधिक 299 धावा केल्या आहेत. आयसीसी महिला T20 विश्वचषक इतिहासातील ही दुसरी सर्वात यशस्वी सलामीची जोडी आहे. याआधी 2020 टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी आणि अॅलिसा हिली यांनी डावाची सुरुवात करताना 352 धावा जोडल्या होत्या. अंतिम सामन्यात पुन्हा एकदा ताजमिन ब्रिट्स आणि लॉरा वोल्वार्ड यांनी चांगली भागीदारी करण्यात यश मिळवले, तर ऑस्ट्रेलियासाठी विजय कठीण होईल.


आजवरचा इतिहास


दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा T20 रेकॉर्ड जबरदस्त आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. हे सर्व सामने जिंकण्यात ऑस्ट्रेलियन संघ यशस्वी ठरला. अलीकडेच या विश्वचषकात खेळल्या गेलेल्या सामन्यात कांगारू संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच विश्वचषक जिंकणार की ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



कसे आहेत दोन्ही संघ? 


दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन : लॉरा वोल्वार्ड, तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, सुने लुस(कर्णधार), अनेके बॉश, सिनालो जाफ्ता(विकेटकिपर), शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा


ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन : अ‍ॅलिसा हिली (विकेटकिपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ऍशलेग गार्डनर, ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेरेहॅम, जेस जोनासेन, मेगन शुट, डार्सी ब्राउन


हे देखील वाचा-