IND vs LEI 1st Day: भारत आणि काऊंटी संघ लिसेस्टरशायर (Leicestershire vs India) यांच्यात सराव सामना खेळला जात आहे. तब्बल तीन महिन्यानंतर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. एका 21 वर्षाच्या काऊंटी क्रिकेट गोलंदाज रोमन वॉकरसमोर भारतीय संघानं लोटांगण घातलं. त्यानं रोहित शर्मा, हनुमा विहारी, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर या पाच भारतीय फलंदाजाला आपल्या जाळ्यात अडकवलं.  रोमन वॉकर कोण आहे? हे जाणून घेऊयात. 


रोमन वॉकर कोण आहे?
वॉकरनं आतापर्यंद देशांतर्गत क्रिकेट खेळलं आहे. याआधी त्यानं दोन लिस्ट ए मॅच खेळल्या आहेत. ज्यात त्याला एकच विकेट मिळाली. वाइटॅलिटी ब्लास्टमध्ये वॉकरनं लिसेस्टशायरकडून 13 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं एकूण 17 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, वॉकर 2018 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड क्रिकेट संघाचा देखील भाग होता. परंतु, त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही.


पहिल्या दिवशी 60.2 षटकाचा खेळ
भारताविरुद्ध सुरु असलेल्या सराव सामन्यात वॉकरनं भारताच्या पाच महत्वाच्या फलंदाजाला पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. वॉकर आगामी काळात इंग्लंडचा स्टार गोलंदाज ठरू शकतो, असं म्हणण वावगं ठरणार नाही.सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 60.2 षटकांचा खेळ होऊ शकलाय. पहिल्या दिवशी भारतानं आठ विकेट्सच्या मोबदल्यात 246 धावा केल्या.


81 धावांवर भारताचा निम्मा संघ माघारी परतला
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार रोहित शर्मानं 25 धावा करून बाद झाला. त्यानंतर विकेट्सची रांगच लागली. या सामन्यातही विराट कोहलीला काही खास कामगिरी करता आली नाही. विराट 33 धावा करून माघारी परतला. केएस भरतनं भारतीय संघाची एक बाजू संभाळून ठेवली. परंतु, दुसऱ्या टोकाकडून विकेट्स पडण्याचा क्रम सुरुच होता. भारतीय संघानं केवळ 81 धावांवर पाच विकेट्स गमावले.पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भरत क्रीझवर उभा होता.


हे देखील वाचा-