Shoaib Akhtar On Babar Azam Captaincy : टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2024)  बाबर आझमच्या पाकिस्तान संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. गतवेळच्या उपविजेत्या पाकिस्तानला सुपर 8 मध्येही स्थान मिळवता आले नाही. टी20 विश्वचषकात बाबर आझमच्या (Babar Azam) संघाने लाजीरवाणी कामिगिरी केली आहे. नवख्या अमेरिका संघानेही पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे पाकिस्तान संघावर टीकेची झोड उडत आहे. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) बाबार आझमच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले, त्याशिवाय त्यानं पाकिस्तानच्या कामगिरीवरही नाराजी व्यक्त केली. 


पाकिस्तानचं विश्वचषकातील आव्हान संपल्यानंतर बाबर आझम याच्यावर टीकेची झोड उडाली. शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) बाबरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याला कोणत्या आइनस्टाइनने कर्णधार केले? असा प्रश्न उपस्थित केला.  बाबर आझम टी20 आणि वनडे सामन्यात खेळण्याच्या लायकीचा नसल्याची टीकाही शोएब अख्तरने केली. दरम्यान, टी20 विश्वचषकातील आव्हान संपल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये कर्णधारपदावरून खळबळ उडाली. 2023 वनडे विश्वचषकानंतर बाबरने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर शाहीन आफ्रिदीला T20 चे कर्णधार बनवण्यात आले. मात्र टी-20 विश्वचषकापूर्वी बाबरला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले होते.






शोएब अख्तरने पाकिस्तानमधील बट स्पोर्ट्स टीव्हीवर बोलताना बाबरच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला की, "बाबर आझमला कोणी कर्णधार बनवले? तो आइन्स्टाइन कोण होता? मला ती व्यक्ती जाणून घ्यायची आहे. तो यासाठी पात्र आहे का? त्याला कर्णधारपदाबद्दल काही माहिती आहे का?" बाबर आझम कर्णधारपदाच्या लायक नाही त्याला कर्णधारपदाबद्दल एकदोन गोष्टी माहिती आहेत का? असे परखड मतही यावेळी शोएब अख्तरने व्यक्त केले.  






शोएब अख्तर म्हणाला की, आता बाबरचे काय होणार? तो चौथ्या क्रमांकावर येईल. त्याला सामने पूर्ण करावे लागतील. त्याला सामने जिंकावे लागतील, जर तो जिंकला नाही तर तो आपले स्थान राखू शकणार नाही. 


विश्वचषकातील पाकिस्तानची कामगिरी - 


अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तान संघाला तीन सामन्यात दोन पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिका आणि भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानला फक्त आयर्लंड आणि कॅनडाविरोधात विजय मिळवता आला. फलंदाजी आणि गोलंदाजीत पाकिस्तानचा संघ फेल ठरलाच, पण फिल्डिंगमध्येही पाकिस्तानच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही.