WI Vs PAK: वेस्टइंडीजमध्ये सध्या पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यानंतर कालच्या सामन्यात पाकिस्ताननं सात धावांनी विजय मिळवला. या सामन्याचा हिरो ठरला मोहम्मद हाफिज. हाफिजचं चार षटकात केवळ 6 धावा देत एक विकेट घेतली. चार षटकात केवळ सहा धावा देण्याचा नवा विक्रम हाफिजच्या नावावर झाला आहे. या कामगिरीमुळं त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
पाकिस्ताननं आधी फलंदाजी करत आठ विकेट्स गमावत 157 धावा केल्या. या धावांच्या प्रत्युत्तरात निकोलस पूरनच्या शानदार खेळाच्या बळावर वेस्टइंडिज 150 धावांपर्यंत पोहोचला मात्र विजय मिळवू शकला नाही. पूरनने सहा षटकार आणि चार चौकारांच्या मदतीनं केवळ 33 चेंडूत 62 धावा केल्या मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
पाकिस्ताननं चांगली सुरुवात केली. कर्णधार बाबर आझमनं 51 तर मोहम्मद रिझवाननं 46 धावा केल्या. पाकिस्ताननं शेवटच्या चार षटकात सहा विकेट्स गमावल्या. यामुळं संघ 157 धावाच करु शकला. वेस्ट इंडिज कडून जेसन होल्डरनं 26 धावा देत चार विकेट घेतल्या.
हाफिजची शानदार गोलंदाजी
वेस्ट इंडिजचे आक्रमक फलंदाजांनी पाकिस्तानच्या बाकीच्या गोलंदाजांना धुतलं मात्र हाफिजच्या गोलंदाजीसमोर ते फिके पडले. वेस्टइंडिजकडून एविन लुईस 33 चेंडूत 35 धावा बनवून रिटायर्ड हर्ट झाला. शेवटी पूरननं येऊन चांगली फटकेबाजी केली. हाफिजनं चार षटकात केवळ सहाच धावा दिल्या. या विजयासह पाकिस्तानं चार टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.