U-20 Wrestling World Championships: भारताची 17 वर्षीय कुस्तीपटू अंतिम पंघलनं (Antim Panghal) इतिहास रचलाय. बुल्गारियाच्या (Bulgari) सोफिया (Sofia) येथे सुरू असलेल्या 20 वर्षांखालील कुस्ती जागतिक स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या अॅटलिन शागायेवाचा 8-0 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलंय. तसेच 20 वर्षांखालील कुस्ती जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरलीय. 


ट्वीट-



या स्पर्धेत अंतिम पंघलनं सातत्यानं चांगली कामगिरी केलीय. या स्पर्धेच्या पात्रता फेरीत अंतिमनं जर्मनीच्या अमोरी अँड्रिचचा क्निकल सुपीरियॉरिटीनं (11-0) पराभव केला. तसेच उपांत्यपूर्व फेरीत जपानची कुस्तीपटू अयाका किमुरा हिचा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत युक्रेनच्या नतालिया क्लिव्हचुस्तकाचा 11-2 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली. 


ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचं ध्येय
सुवर्णपदक सामना जिंकल्यानंतर अंतिम म्हणाली की, 'मला रेकॉर्डबद्दल माहिती नव्हती. सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रशिक्षकानं मला सांगितले की, ही स्पर्धा जिंकणारी तू पहिली भारतीय मुलगी आहेस. मला कुस्तीमध्ये करिअर करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी माझ्या पालकांचं आभार मानते. विशेषत: दीदीनं (कबड्डीपटू सरिता) मला खूप पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिलं. ऑलिम्पिकमध्येही भारतासाठी पदक जिंकण्याचं माझं ध्येय आहे.


अंतिमची दमदार कामगिरी
अंतिमनं यापूर्वी कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप (2021) मध्ये कांस्य आणि आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप (2022) मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. तिनं यावर्षी अंडर 23 आशियाई चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदक जिंकलं होते.


भारताच्या खात्यात 12 पदकं
20 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतानं 12 पदक मिळवली आहेत. सोनम मलिकनं 62 किलो गटात तर, प्रियांकानं 65 किलो गटात रौप्यपदक जिंकलं. त्याचवेळी 72 किलो गटात रितिका आणि 57 किलो गटात सितोनं कांस्यपदक पटकावलंय.  पुरुष खेळाडूंनीही एक रौप्य आणि 6 कांस्यपदक जिंकले आहेत.


अमित शाहचं अभिनंदन ट्वीट-
अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल अमित शाह यांनी अंतीम पंघालचे अभिनंदन केलं. "अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी हिली भारतीय मुलगी ठरल्याबद्दल अंतिम पंघलचे अभिनंदन. भारत तुमच्या मेहनतीला आणि वचनबद्धतेला सलाम करतो. तुमच्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा", असं अमित शाहनं म्हटलंय.


हे देखील वाचा-