IND vs BAN 2nd Test Day 3: शेरे बांगला स्टेडियममध्ये (Shere Bangla National Stadium) खेळला जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या संघानं भारतासमोर 145 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं तिसऱ्या दिवसाखेर चार विकेट्स गमावून 45 धावा केल्या आहेत. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर नाव कोरण्यासाठी भारत अवघ्या 100 धावा दूर आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) बांगलादेशच्या तैजूल इस्लामशी भिडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बांगलादेशनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली अवघ्या एका धावेवर बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी जल्लोष केला. त्यावेळी तैजुल इस्लाम विराटला काही तरी म्हणाला. ज्यावर विराट चिडला आणि तो तैजुल इस्लामकडं जाऊ लागला. पण मैदानात असलेल्या पंचांनी मध्यस्ती करत वाद मिटवला. त्याचवेळी बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनही तेथे पोहोचला. कोहलीनं शाकिबकडं तक्रार केली. त्यानंतर शाकिब तैजुलकडं जाऊन त्याला समजावताना दिसला.
व्हिडिओ-
विराट कोहलीची निराशाजनक कामगिरी
सामन्याचा तिसरा दिवस कोहलीसाठी चांगला गेला नाही. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात कोहलीनं स्लिपमध्ये अनेक झेल सोडले. यातील काही झेल अवघड होते, पण कोहली ज्या प्रकारचा क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून असे झेल घेणे नेहमीच अपेक्षित असते. यानंतर फलंदाजीत त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. भारताच्या दुसऱ्या डावात त्यानं 22 चेंडूचा सामना करत फक्त एक धाव केली.
भारताची मालिकेत आघाडी
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 1-0 नं आघाडीवर आहे. भारतानं पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 404 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारतानं दोन बाद 258 धावा करून डाव घोषित केला. दरम्यान, 513 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 324 धावांवर ढेपाळला.
बांगलादेशची प्लेईंग इलेव्हन:
नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, तस्किन अहमद.
भारताची प्लेईंग इलेव्हन:
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
हे देखील वाचा-