Virat Kohli PC : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका आता अंतिम टप्प्यात आली असून तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना उद्यापासून (11 जानेवारी) आफ्रिकेच्या केपटाऊन येथे खेळवला जाणार आहे. यापूर्वी भारतीय कर्णधार विराटने पत्रकार परिषद घेतली असून यावेळी त्याने तिसऱ्या सामन्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारताने गमावला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे संघात नव्हता. ज्यामुळे राहुलने कर्णधारपद सांभाळलं. पण आता तिसऱ्या सामन्यापूर्वी विराट पूर्णपणे फिट झाला असून तो तिसऱ्या सामन्यात खेळणार असल्याचं त्याने स्वत: सांगितलं. पण दुसरीकडे भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed SIraj) मात्र दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्याला मुकणार असल्याचंही विराटने सांगितलं.





 


'वेगवान गोलंदाजाबाबत जोखीम घेऊ शकत नाही'


दुसऱ्या सामन्यादरम्यान दुखापतीने ग्रस्त झालेल्या सिराज तिसऱ्या कसोटीत खेळणार का? हा प्रश्न अनेकांना होता. याबद्दल विराटने दिलेल्या माहितीनुसार, सिराज संपूर्णपणे फिट झाला नसून एका वेगवान गोलंदाजाला दुखापत असताना खेळवणं त्याच्यासाठी अधिक धोकादायक ठरु शकतं, त्यामुळे त्याला विश्रांती दिली जाणार असल्याचं विराट म्हणाला.


मालिका रंगतदार स्थितीत


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत पहिला सामना भारताने 113 धावांनी जिकंला. पण दुसऱ्या सामन्यात वेळीच भारत आफ्रिकेचे फलंदाज बाद न करु शकल्याने सात विकेट्सनी भारताला पराभव स्विकारावा लागला. ज्यामुळे मालिकेत दोन्ही संघ 1-1 च्या बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक असून हा सामना जिंकणारा संघच मालिका जिंकणार आहे.


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha