Indian Cricket Fans: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या अडीच वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंजतोय. नोव्हेंबर 2019 पासून विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. ज्यामुळं भारतीय क्रिकेट चाहते त्याच्या प्रदर्शनाबाबत नकारात्मक प्रतिक्रिया देतायेत. याचदरम्यान, विराट कोहलीनं मेन्टल हेल्थबाबत (Mental Health) मोठ वक्तव्य केलंय. "माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या लोकांमध्येही मला कधीकधी एकटेपणा जाणवतो", असंही विराट कोहलीनं म्हटलंय. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. याआधी इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सनंही (Ben Stokes) मेन्टल हेल्थवर भाष्य केलं, त्यावेळी याच भारतीय चाहत्यांनी त्याला सहानुभूती दर्शवली होती. मात्र, विराट कोहलीबाबत याउलट पाहायला मिळत आहे. 


मेन्टल हेल्थबाबत विराट काय म्हणाला? 
"खेळाडूसाठी त्याचा खेळ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या खेळच त्याला सर्वोत्तम बनवतो. परंतु, ज्यावेळी तुम्ही दबावात असता, त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हा एक गंभीर मुद्दा आहे. आपण जेवढे अधिक सशक्त राहण्याचा प्रयत्न करतो, तेवढचं हा तुम्हाला लांब घेऊन जातो. जेव्हा तुमचा खेळाशी संबंध तुटतो, तेव्हा तुमच्या आसपासच्या गोष्टी संपायला वेळ लागत नाही. यावेळी तुम्हाला तुमच्या वेळेचं विभाजन कशाप्रकारे करता येईल? हे शिकलं पाहिजे. एखाद्याच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे", असंही विराट कोहली म्हणाला आहे.


विराट कोहलीचा खराब फॉर्म
भारतीय क्रिकेट संघासाठी शतकांवर शतक ठोकणारा विराट कोहलीची बॅट जवळपास तीन वर्षांपासून शांत दिसत आहे. विराटनं कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. तेव्हापासून विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट सध्या  20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे.


विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीनं भारतासाठी 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 99 टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळला आहे. विराटनं कसोटीत 8 हजार 74 धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 हजार 344 धावा आणि टी-20 क्रिकेटमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही. आशिया चषकात विराट कोहलीची भारतीय संघात निवड करण्यात आलीय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघ आशिया चषकातील त्यांचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा केली जात आहे. 


हे देखील वाचा-