Virat Kohli Stats : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्याची कसोटी मालिका संपली, यामध्ये टीम इंडियाने 1-0 च्या फरकाने विजय मिळवला. आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. विराट कोहलीचा हा 501 वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेला दुसरा कसोटी सामना विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात किंग कोहलीने शतक ठोकले होते. विराट कोहलीचे हे 76 वे आंतरराष्ट्रीय शतक होय. विराट कोहलीने वनडे, टी20 आणि कसोटीमध्ये दमदार प्रदर्शन केलेय. क्रिकेटच्या तिन्ही प्रकरात कोहलीने धावांचा पाऊस पाडलाय. विराट कोहलीने 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळत मोठा किर्तीमान केलाय. 


सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंगपेक्षा कोहली उजवा!


आकड्यावर नजर मारल्यास विराट कोहलीची कामगिरी सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग यांच्यापेक्षा उजवी आहे. विराट कोहलीने 500 आंतरराष्ट्रीय सामन्यात 25582 धावांचा पाऊस पाडलाय. या तुलनेत सचिन आणि पाँटिंग यांचे आकडे कमी आहेत. रिकी पाँटिंग याने 500 आंतरराष्ट्रीय सामने झाले तेव्हा 25035 धावा केल्या होत्या. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 500 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर 24874 धावा केल्या होत्या. या आकड्यावरुन विराट कोहली या दिग्गजांपेक्षा उजवा असल्याचे दिसतेय. 


विराट कोहलीचे करिअर कसे राहिलेय ?


माजी कर्णधार विराट कोहलीने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विराट कोहलीने आतापर्यंत 274 वनडे सामन्यात 57.32 च्या सरासरीने 12898 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये 46 शतके आणि 65 अर्धशतकांचा समावेश आहे. 111 कसोटी सामन्यात विराट कोहलीने 29 शतकांच्या मदतीने 8676 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने 29 अर्धशतकेही ठोकली आहेत. टी 20 मध्ये विराट कोहलीची बॅट तळपली आहे. 115 टी 20 सामन्यात विराट कोहलीने 4008 धावा चोपल्या आहेत, यामध्ये एक शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. टी 20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे.


वनडेमध्ये करणार मोठा विक्रम - 


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिल्या वनडे सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. वनडेमध्ये 13 हजार धावांचा माईलस्टोन पार करण्यासाठी विराट कोहलीला फक्त 102 धावांची गरज आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीने हा पराक्रम केला तर सर्वात वेगात 13 हजार धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा होणार आहे. सचिन तेंडुलकरला हा पल्ला पार करण्यासाठी 321 डावांची गरज लागली होती. विराट कोहली 265 डावात हा पल्ला पार करणारा खेळाडू होईल.