Virat Kohli on Mental Health: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालाय. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर त्याला झिम्बाब्वे दौऱ्यात विश्रांती देण्यात आलीय. विराट कोहली गेल्या अडीच वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देतोय. या कालावधीत त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं त्याला टीकेचं धनी व्हावं लागतंय. आगामी आशिया चषकात विराट कोहलीची भारतीय संघात निवड झालीय. भारत या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यापूर्वी विराट कोहलीनं मेन्टल हेल्थबाबत मोठ वक्तव्य केलंय. "माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या लोकांमध्येही मला कधीकधी एकटेपणा जाणवतो", असंही विराट कोहलीनं म्हटलंय.


विराट कोहली काय म्हणाला? 
विराट कोहलीनं एका मुलाखतीत असं म्हटलंय की, "खेळाडूसाठी त्याचा खेळ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या खेळच त्याला सर्वोत्तम बनवतो. परंतु, ज्यावेळी तुम्ही दबावात असता, त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हा एक गंभीर मुद्दा आहे. आपण जेवढे अधिक सशक्त राहण्याचा प्रयत्न करतो, तेवढचं हा तुम्हाला लांब घेऊन जातो. जेव्हा तुमचा खेळाशी संबंध तुटतो, तेव्हा तुमच्या आसपासच्या गोष्टी संपायला वेळ लागत नाही. यावेळी तुम्हाला तुमच्या वेळेचं विभाजन कशाप्रकारे करता येईल? हे शिकलं पाहिजे. एखाद्याच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे", असंही विराट कोहली म्हणाला आहे.


विराट कोहलीची खराब फॉर्मशी झुंज
विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. 


विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.


हे देखील वाचा-