Virat Kohli May Step Down from ODI and Test Captaincy : अनुभवी रोहित शर्माकडे (Rohit sharma) भारतीय संघाच्या टी-20 संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. वर्कलोडचे कारण देत विराट कोहलीनं (Virat Kohli) टी-20 चं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर आयपीएलमधील आरसीबी (RCB) संघाचेही कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराटनं घेतला होता. आता रवी शास्त्री यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहली टी-20 संघापाठोपाठ भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही सोडण्याचा विचार करू शकेल, असे वक्तव्य भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलं आहे. यूएई येथे झालेल्या विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा भारतीय संघासोबतचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्यानंतर आता राहुल द्रविड याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. 


विराट कोहलीवरील एका प्रश्नावर बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ मागील पाच वर्षे कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढणे शक्य नाही. पण कोरोना आणि बायोबबल यामुळे मानसिक थकवा जाणवत असल्यास तसेच आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे असल्यास विराट कोहली स्वत:हून भविष्यात कर्णधारपद सोडू शकेल. मात्र, हे नजीकच्या काळात होण्याची शक्यता कमी आहे, असे शास्त्री म्हणाले. कसोटी संघाचे दीर्घकाळ नेतृत्व करता यावे यासाठी विराट कोहली एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होऊ शकतो, असेही शास्त्री यांनी सांगितलं.  


क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची विराट कोहलीमधील भूक अद्याप कायम आहे. संघातील इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा विराट कोहली तंदुरुस्त आहे, यात दुमत नाही. जेव्हा तुम्ही शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असता तेव्हा तुम्ही जास्त काळ क्रिकेट खेळू शकता.   कर्णधारपदाबाबत विराट कोहलीचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. भविष्यात विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधापद सोडू शकतो. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये कायम राहू शकतो. कारण, कसोटीमध्ये विराट कोहली सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे, असे शास्त्री म्हणाले.  


न्यूझीलंडचा भारत दौरा - 
टी-20 वर्ल्डकपनंतर न्यूझीलंड भारताच्या दौऱ्यावर येत आहे. यामध्ये तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी जयपूरमध्ये पहिला टी-20 सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी रांची येथे दुसरा, 21 नोव्हेंबर रोजी कोलकातामध्ये तिसरा सामना होणार आहे. त्यानंतर 25 ते 29 नोव्हेंबरपर्यंत कानपूरमध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. तर 3 ते 7 डिसेंबरदरम्यान दुसरा कसोटी सामना होणार आहे. 


2023 पर्यंत दोन वर्ल्डकप
2023 पर्यंत दोन विश्वचषक होणार आहेत. 2022 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रोलियात टी-20 वर्ल्डकप होणार आहे. 2023 मध्ये एकदिवसीय सामन्याचा विश्वचषक सामना होणार आहे. दोन मोठ्या स्पर्धेपूर्वी रोहित शर्माला संघ बांधणीसाठी वेळ मिळेल. ऑस्ट्रेलियातील मोठी मैदानं पाहाता रोहित शर्मा आपला चांगला संघ तयार करेल. त्यासोबतच रोहित शर्माला मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा अनुभव आहे, त्याचाही भारतीय संघाला फायदा होणार आहे.   


कर्णधार म्हणून रोहित शर्माचं रेकॉर्ड जबरदस्त –
कर्णधार म्हणून रोहित शर्माचं रेकॉर्ड जबरदस्त आहे. 19 सामन्यात रोहित शर्मानं भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी भारतीय संघानं 15 विजय मिळवले आहे. तसेच आयपीएलमध्ये आपल्या संघाला रोहित शर्मानं 59.68 टक्के सामने जिंकून दिलेत. पाच वेळा चषकावर नाव कोरणारा, रोहित शर्मा आयपीएलमधील एकमेव कर्णधार आहे.