Virat Kohli Record : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांचा सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी उत्साहच असतो. या सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू हिरो होतो. आज नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने असतील.  दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. सकाळपासूनच चाहत्यांनी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आजच्या सामन्यात कोण लक्षवेधी कामगिरी करणार, याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. पण या सामन्यात सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी विराट कोहलीकडे (Virat Kohli) आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरोधात सर्वाधिक धावा कऱण्याचा विक्रम मोडण्याची संधी विराट कोहलीकडे आहे. कदाचीत ही अखेरची संधी विराट कोहलीकडे असेल. 


विराट कोहली सध्या 34 वर्षांचा आहे. त्यामुळे पुढील विश्वचषकात खेळण्याची शक्यता आताच सांगता येत नाही. त्याशिवाय पुढील विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार की नाही, हेही अद्याप सांगता येणार नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची विराट कोहलीकडे ही अखेरची संधी असेल. विश्वचषकात पाकिस्तानविरोधात सर्वाधिक धावा चोपण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरोधात आतापर्यंत पाच सामन्यात 313 धावा चोपल्या आहेत. 1992 ते 2011 या दरम्यान पाच विश्वचषकात 78 च्या जबरदस्त सरासरीने सचिन तेंडुलकरने 313 धावा चोपल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 98 राहिली आहे. विराट कोहलीला हा विक्रम मोडण्यासाठी 120 धावांची गरज आहे. 


विराट कोहलीने 2011 ते 2019 यादरम्यान विश्वचषकात पाकिस्तानविरोधात तीन सामने खेळले आहेत. या तीन सामन्यात एक शतक आणि एका अर्धशतकासह 64 च्या सरासरीने 193 धावा केल्या आहेत. 2011 चा अपवाद वगळता विराट कोहलीने इतर दोन्ही सामन्यात पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे. विराट कोहलीचा अनुभव आता आणखी वाढला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात तो मोठी धावसंख्या उभारेल अशीच सर्व भारतीयांना इच्छा आहे. अशात विराटकडे या विश्वचषकात सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे. विराट आणि सचिन यांच्यात 120 धावांचे अंतर आहे. जर विराटने या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 120 धावांहून अधिक धावा केल्या, तर तो सचिनचा विक्रम मोडण्यात यशस्वी ठरू शकतो.


सचिन आणि विराट कोहलीनंतर पाकिस्तानविरोधात पाकिस्तानविरोधात विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्यात रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने 2015 आणि 2019 या दोन विश्वचषकात पाकिस्तानविरोधात 155 धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने पाकिस्तानविरोधात 140 धावांची खेळी केली होती. विश्वचषकात पाकिस्तानविरोधात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. भारताकडून पाकिस्तानविरोधात आतापर्यंत फक्त दोन शतके झळकावली आहेत. यामध्ये एक विराट आणि दुसरा रोहित शर्मा यांचा समावेश आहे.