Virat Kohli Post : टीम इंडियानं नामिबियाचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवून विश्वचषक मोहिमेची विजयानं सांगता केली. भारताच्या गटातून पाकिस्तान आणि न्यूझीलंडनं आधीच सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म केलं होतं. त्यामुळे या लढतीत केवळ औपचारिकता उरली होती. टीम इंडियाने संपूर्ण विश्वचषकात साजेशी कामगिरी केली नसली तरी शेवटच्या तीन सामन्यात टीम इंडियाला चांगली कामगिरी करता आली. दरम्यान कर्णधार या नात्यानं विराट कोहलीचा हा अखेरचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना होता. तर रवी शास्त्रींच्या प्रशिक्षकपदाचा कालावधीही आज संपला. त्यामुळे या दोघांना टीम इंडियाकडून विजयी भेट मिळाली.
नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतर ट्वेन्टी ट्वेन्टी कप्तान म्हणून विराटने शेवटची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तो म्हणाला, “एकत्रितपणे आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यासाठी निघालो. दुर्दैवाने आम्ही कमी पडलो आणि एक संघ म्हणून आमच्यापेक्षा कोणीही जास्त निराश नाही. तुम्हा सर्वांकडून मिळालेला पाठिंबा अप्रतिम आहे आणि आम्ही त्यासाठी आभारी आहोत. आम्ही दमदार पुनरागमनासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊ आणि आमचे सर्वोत्तम पाऊल टाकू. जय हिंद.”
टीम इंडियाचा नामिबीयावर 9 विकेट्सनी धुव्वा
टीम इंडियानं नामिबियाचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवून विश्वचषक मोहिमेची विजयानं सांगता केली. या सामन्यात नामिबियानं भारतासमोर 133 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं हे आव्हान 16व्या षटकातच पार केलं. रोहितनं 56 तर राहुलनं 54 धावांची खेळी केली. या दोघांनी 86 धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला.
नवा ट्वेन्टी ट्वेन्टी कर्णधारपदासाठी रोहित शर्माच्या नावाची चर्चा
विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा नवा ट्वेन्टी ट्वेन्टी कर्णधार कोण याची घोषणा अद्याप झालेली नाही. पण ट्वेन्टी ट्वेन्टीच्या या छोट्या फॉरमॅटसाठी रोहित शर्माच कर्णधार म्हणून फेव्हरेट मानला जातोय. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेआधी रोहित शर्माचीच ट्वेन्टी ट्वेन्टी कर्णधारपदी निवड केली जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं याबाबत संकेतही दिले. रोहित शर्मा गेल्या काही काळापासून सगळ्या गोष्टी पाहतोय असं विराटनं नाणेफेकीवेळी म्हटलं होतं.
टी-20 विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा शेवट गोड झालाय. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौरा करणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 सामने आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.
संबंधित बातम्या
Virender Sehwag on Kohli: '...तर, आज विराट कोहली संघात नसता' वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा