Virender Sehwag: भारतीय संघानं गेल्या वर्षी खेळण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करून दाखवली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला पहिल्याच फेरीतून बाहेर पडावं लागलं होतं. मात्र, आगामी टी-20 विश्वचषकात भारतीय संघ नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं विश्वचषकाच्या संघ निवडीबाबत आपलं मत मांडलं आहे. तसेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी सेहवागनं भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीलाच वगळलं आहे.
भारताची गेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवानं झाली होती. या विश्वचषकानंतर भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. विश्वचषकानंतर विराट कोहलीनं भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर रोहित शर्मालाकडं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर, रवी शास्त्रीच्या जागी राहुल द्रविड आता भारतीय संघाचा प्रशिक्षक बनला आहे.
वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
भारताने रोहित शर्मा, केएल राहुल आणि इशान किशनला आपल्या पहिल्या तीनमध्ये ठेवावं, असे वीरेंद्र सेहवागचं मत आहे. सेहवाग म्हणाला की, ‘‘भारताकडे अनेक पर्याय आहेत. पण माझा असा विश्वास आहे की भारत या वर्षी ऑस्ट्रेलियात विश्वचषक खेळायला जाईल, तेव्हा फक्त रोहित शर्मा, इशान किशन आणि केएल राहुल हे पहिल्या तीनमध्ये असावेत.
वीरेंद्र सेहवागचा भारतीय संघाला सल्ला
महत्वाचं म्हणजे, भारताच्या मर्यादीत षटकाच्या सामन्यांमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात येतो. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्म विराट कोहलीची साथ सोडायचं नाव घेईना. "भारताला लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशनसह सलामी दिली पाहिजे. मग तो रोहित शर्मा- ईशान किशन असो किंवा केएल राहुल- ईशान किशन", असंही वीरेंद्र सेहवागनं म्हटलंय.
उमरान मलिकाला संधी मिळण्याची मागणी
सेहवागनं उमरान मलिकला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी संधी द्यावी, असा सल्ला दिला आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसह उमरान मलिकला भारताच्या गोलंदाजीचा भाग बनवायला हवं, असं सेहवागचं म्हणणं आहे.
हे देखील वाचा-
- ENG vs NZ: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंडला नमवून इंग्लंड बनला 'चेज मास्टर'!
- Deepak Punia wins bronze medal: दीपक पुनियानं किर्गिझस्तानमध्ये तिरंगा फडकावला, सत्यबेल्डीला हरवून कांस्यपदक जिंकलं
- NZ vs IND: टी-20 विश्वचषकानंतर भारत न्यूझीलंडचा दौरा करणार; कधी, कुठे रंगणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक