Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठी खेळी करण्यासाठी संघर्ष करत होता. परंतु, काल खेळण्यात आलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध विराट कोहलीची बॅट तळपल्याची पाहायला मिळाली. या सामन्यात विराट कोहलीनं जोरदार फटकेबाजी करत नाबाद 122 धावांची खेळी केली. ज्यात 12 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. हे विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 71 वं शतक आहे. विराटनं 23 नोव्हेंबर 2019 ला बांग्लादेश विरुद्ध 70 वं शतक ठोकलं होतं. मात्र, त्यानंतर 71 वं शतक झळकावण्यासाठी त्याला जवळपास तीन वर्षांचा कालावधी लागला. विराट कोहलीची 71 वं शतकानंतर तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांचा विक्रम मोडणार का? यावर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागन आपलं मत मांडलंय. 


वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
क्रिकबझशी बोलताना वीरेंद्र सेहवागला विराटच्या 71 व्या शतकाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी सेहवाग म्हणाला की, "विराटच्या शतकानं केवळ मीच नव्हे तर, संपूर्ण भारत आनंदी आहे. दिर्घकाळापासून विराटचे चाहते त्याच्या शतकाची प्रतिक्षा करत होते. विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये आलाय तर, त्यानं 100 शतक पूर्ण करूनच थांबावं. त्यानंतरही विराटचं 101 वं शतक पाहण्यासाठी तीच उस्तुकता असेल."


आशिया चषकात विराटची दमदार फलंदाजी
अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलच्या खांद्यावर भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या सामन्यात केएल राहुल सोबत विराट कोहली सलामी देण्यासाठी मैदानात आला होता. या सामन्यात विराटनं 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 122 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात विराट त्याच्या जुन्या अंदाजात फलंदाजी करताना दिसला. यंदाच्या आशिया चषकात विराट कोहलीनं 92 च्या सरासरीनं आणि 147 च्या स्ट्राईक रेटनं 276 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या आशिया चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहली सध्या टॉपवर आहे.


विराटच्या 71 व्या शतकापूर्वी शोएब अख्तर काय म्हणाला?
विराटच्या 71 व्या शतकापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं त्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी शोएब अख्तर म्हणाला होता की, "विराट कोहली हा ऑल टाइम ग्रेटेस्ट प्लेयर बनू शकतो. पण यासाठी विराट कोहलीला तो एक महान खेळाडू असल्याचं इतरांना दाखवून द्यावा लागेल. सचिन तेंडुलकरचा शंभर शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला आणखी 30 शतकं करावी लागतील. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली मैदानात आल्यावर त्याला वेळ मिळेल, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेटचा मुद्दा असतो, त्यामुळे मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये वेळ कमी असतो. याशिवाय संघाची गरज यांसारख्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. विराट कोहली हा सकारात्मक आणि आक्रमक खेळाडू आहे. याशिवाय, तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे यात काही शंका नाही. माझी इच्छा आहे की, विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शंभर शतकांचा टप्पा गाठावा आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून काढावा. परंतु, विराटचा सध्याचा फॉर्म पाहता हे अशक्य वाटत आहे." 


हे देखील वाचा-