Vinod Kambli Sachin Tendulkar: क्रिकेटचे गुरू द्रोणाचर्य रमाकांत आचरेकर यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त काल मुंबई क्रिकेटची पंढरी असलेल्या शिवाजी पार्क मैदान परिसरात आचरेकर सरांचं एक स्मारक उभारण्यात आलंय. गेट नंबर 5 जवळ उभारलेल्या या स्मारकाचं अनावरण आचरेकर सरांचा सर्वात आवडता शिष्य भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला विनोद कांबळी (Vinod Kambli) यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलेल्या आचरेकर सरांच्या माजी विद्यार्थ्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही विशेष उपस्थिती होती.


आचरेकर सरांचं स्मारक उभारण्याची संकल्पना राज ठाकरे यांची होती. त्यामुळे इथं आचरेकर सरांचा पुतळा उभारण्याऐवजी क्रिकेटचं दर्शन घडवणारं एक अनोख स्मारक उभारण्यात आलंय. ज्यात दिग्गज क्रिकेटर्सची स्वाक्षरी असलेली बॅट, स्टम्प्स, ग्लोव्हज आणि आचरेकर सरांची ओळख असलेली त्यांची रोमिओ कॅप बसवण्यात आली आहे. सदर कार्यक्रमात सचिन तेंडुलकरसह विनोद कांबळींनी देखील आचरेकर सरांच्या आठवणी सांगितल्या. विनोद कांबळींनी आचरेकर सरांचं आवडतं गाणं...सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये, आजा प्यारे पास हमारे...काहे घबराये, काहे घबराये, हे गाणं गायलं. यावेळी सर्वंच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 


सचिन तेंडुलकर काय म्हणाला?


सचिन तेंडुलकर देखील आचरेकर सरांच्या आठवणीत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. आचेकर सरच का?, हे आजवर मी कधीच कुठे बोललो नाही, असं म्हणत सचिन तेंडुलकरने एक किस्सा सांगितला. अजित (सचिनचा भाऊ) हा कॉलेजमध्ये खेळायचा, तेव्हा सरांच्या विद्यार्थ्यांचा एक वेगळाच थाट होता. ते कधीच त्याचा दडपणाखाली दिसले नाहीत.कारण सर इथं सरावात सामने खेळवायचे. सरांकडे यायचा निर्णय अजितनं माझ्यासाठी घेतला होता. 365 दिवसांत ज्या दिवशी पाऊस पडायचा त्याच दिवशी आराम असायचा. सर आम्हाला विकेट बनवायला लावायचे, त्यामुळे पाणी मारणं रोलर, यांचं काय महत्त्व आहे ते तिथून शिकलो. सरांनी क्रिकेट किटचा आदर करायला शिकवलं. त्यामुळे बॅट आपटणं, फेकणं या गोष्टी कधीही करू नये..., असं सचिन तेंडुलकर म्हणाला. 


आचरेकर सर कधीच मला Well Played म्हणाले नाहीत- सचिन तेंडुलकर


आचरेकर सरांची कौतुक करण्याची स्टाईल वेगळीच होती. त्यांची एक नजरच सगळं बोलून जायचे. ते मला कधीच वेWell Played बोलले नाहीत, म्हणून माझ्या शेवटच्या सामन्याला मी ते बोलून दाखवलं. पण सर मॅचनंतर कधीतरी पैसे द्यायचे, स्कूटरवरून फिरवायचे, भेळ द्यायचे, तेव्हा समजून जायचो आज काहीतरी चांगलं केलंय. सर अधूनमधून आम्हाला घरी बोलवायचे. मटण-करी हा बेत ठरलेला असायचा, मोठं पातेल आणि लिंबू सोबत पाव...ते जे वातावरण होतं ते आपुलकीचं होतं, अशी आठवणही सचिन तेंडुलकरने यावेळी सांगितल्या.