पॅरिस : भारताची पैलवान विनेश फोगाटला (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympics)  50 किलो वजनी गटात नियमापेक्षा 100 ग्रॅम वजन अधिक आढळल्यानं निलंबित करण्यात आलं. यामुळं विनेश फोगाटचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगंल. विनेश फोगाटच्या पदक विजयाच्या जल्लोष साजरा करण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रीडा प्रेमींना यामुळं मोठा धक्का बसला. विनेश फोगाटला देखील या प्रकरणामुळं मोठा धक्का बसला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांच्याशी चर्चा केली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटातील स्पर्धेत रौप्य पदक दिलं जावं या मागणीसाठी विनेश फोगाटनं  कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये ( Court of Arbitration for Sport) अर्ज केला होता.  हा अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 


विनेश फोगाटला दिलासा


विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात रौप्य पदक देण्यात यावं अशी मागणी केली आहे. विनेशला  CAS म्हणजेच  कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट  कडून मोठा दिलासा मिळाला आहे. कुस्तीपटू विनेश फोगट हिचा अर्ज CAS ने सुनावणीसाठी स्वीकारला आहे.  


पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. विनेशने आपल्या अपात्रतेविरुद्ध CAS  कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये अपील दाखल केलं होतं. विनेशच्या याचिकेनुसार तिनं CAS कडे संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली आहे. विनेश फोगाटच्या अर्जावर  कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टनं सुनावणी करण्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्यास सांगितली आहे.  विनेश फोगाटच्या अर्जावर  भारतीय वेळेनुसार उद्या दुपारी १२.३० वाजता सुनावणी होणार आहे. 


विनेश फोगाट कुस्तीमधून निवृत्त 


भारताची पैलवान विनेश फोगाट हिनं आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्यासोबत जे घडलं त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट करत विनेशनं निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. 


विनेश फोगाटनं आई कुस्ती माझ्याविरुद्ध जिंकली आणि मी पराभूत झाली. तुझं स्वप्न, माझी हिम्मत सर्व तुटलंय, यामुळं माझ्यामध्ये अधिक ऊर्जा राहिली नाही. कुस्तीमधील 2001 ते 2024 च्या प्रवासाला अलविदा, तुम्हा सर्वांची ऋणी राहीन, असं विनेश फोगाटनं म्हटलं आहे.  


दरम्यान, विनेश फोगाटनं निवृत्ती जाहीर केली असली तरी  तिची बहीण बबिता फोगाटनं ती भारतात परतल्यानंतर वडील महावीर फोगाट तिच्यासोबत चर्चा करतील, अशी माहिती दिली आहे. 


संबंधित बातम्या :


विनेश फोगाट कुस्तीमधून निवृत्त तर अंतिम पंघालवर तीन वर्षांची बंदी लागणार? जाणून घ्या प्रकरण 

विनेश फोगाटच्या वजनावर लक्ष ठेवण्यात सपोर्ट स्टाफ अपयशी का ठरला? चौकशी होणार