Travis Head Century Brisbane IND vs AUS 3rd Test : ट्रॅव्हिस हेड पुन्हा एकदा भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत त्याने शानदार शतक झळकावले आहे. हेडचे कसोटी कारकिर्दीतील हे 9वे शतक असून भारताविरुद्धचे एकूण तिसरे शतक आहे. आपल्या खेळीत एकूण 13 चौकार मारून शतक ठोकण्याबरोबरच त्याने टीम इंडियाला बॅकफूटवरही पाठवले. हेडचे हे शतकही संस्मरणीय आहे कारण ब्रिस्बेनमध्ये खेळलेल्या गेल्या तीन डावांत तो गोल्डन डकचा बळी ठरला होता.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024 मधील ट्रॅव्हिस हेडचे हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने ॲडलेड पिंक बॉल कसोटीत 140 धावांची इनिंग खेळली होती. त्यावेळी मोहम्मद सिराजने त्याला आऊट केल्यावर दोघांमध्ये झालेला वाद त्या सामन्याचा केंद्रबिंदू ठरला होता. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावातही त्याने 89 धावांची खेळी केली होती.
ऑस्ट्रेलियाने 75 धावांवर मार्नस लॅबुशेनची विकेट गमावली, तेव्हा ट्रॅव्हिस हेड फलंदाजीला आले. तिथे भारताला कांगारूंवर दडपण आणता आले असते, पण ट्रॅव्हिस हेडने प्रतिआक्रमणाची रणनीती आखली होती. त्याने आपल्या नेहमीच्या शैलीत धावा केल्या आणि भारतीय गोलंदाज त्याच्यासमोर असहाय दिसत होते. त्याने स्टीव्ह स्मिथसोबत 150 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे.
भारताविरुद्ध तुफानी शतक ठोकून हेडने केला मोठा पराक्रम
हेडने भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध 13 कसोटी सामने खेळले असून, 50 पेक्षा जास्त सरासरीने 1,000 हून अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याच्या नावावर 3 शतके आणि 5 अर्धशतके आहेत. या मालिकेपूर्वी, त्याने 2021-23 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध त्याचे शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. भारतीय संघाविरुद्ध त्याचे शेवटचे 5 स्कोअर अनुक्रमे 140, 89, 11,18 आणि 163 धावा आहेत.
हेडची कसोटी कारकीर्द?
हेडने 2018 साली पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्याने आतापर्यंत 52 कसोटी सामने खेळले आहेत. आपल्या 85 डावांमध्ये 3,500 हून अधिक धावा करण्यात तो यशस्वी ठरला आहे.त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 9वे शतक आहे. त्याने 18 अर्धशतकेही केली आहेत. आपल्या कसोटी कारकिर्दीत हेडने केवळ भारताविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन भूमीवर हेडचे हे 8 वे शतक आहे.
हे ही वाचा -