Harbhajan Singh Retires: भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यानं आज ट्वीटरच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केलीय. हरभजन सिंहनं त्याच्या कारकिर्दीत भारताला अनेक सामने जिंकून दिले. भारताचा आक्रमक गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जात असून त्याच्या गोलंदाजीसमोर दिग्गज फलंदाजांनी गुडघे टेकले. दरम्यान, हरभजननं पंजाब निवडणुकीच्या तोंडावर निवृत्तीची घोषणा केल्यानं तो राजकीय इनिंगला सुरुवात करणार असल्याची चर्चेनं जोर धरलाय. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पंजाबमध्ये पुढील वर्षी निवडणुका पार पडणार आहेत. यामुळं हरभजन निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो, अशा चर्चांना उधाण आलंय. 


दरम्यान, हरभजन सिंह काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकतो, अशा बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांत झळकत होत्या. तसेच काँग्रेसचा पक्ष त्यांना जालंधरमधून उतरवू शकतो, असंही सांगितलं जातं होतं. काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनीही हरभजन लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी हरभजनसोबतचा एक फोटो ट्विट केला होता. या फोटोवर सिद्धू यांनी दिलेलं कॅप्शननं सर्वांच लक्ष वेधून घेणारं ठरलं होतं. 


नवज्योत सिंह यांचं ट्वीट-



सिद्धू आणि हरभजनची भेट
हरभजननं जालंधर येथून निवडणूक लढवली तर, कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. नवज्योत सिंह सिद्धू हे हरभजन यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका कॉमेन फ्रेन्डच्या माध्यमातून सिद्धू आणि हरभजनची भेट झाली होती. हरभजनला पक्षात आणून दोआबा क्षेत्रात सिद्धू मजबूत होण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसनं दिली होती. 


हरभजनची कारकिर्द
हरभजन सिंहनं 1998 मध्ये पदार्पण केलं होतं आणि तो अखेरचा 2016 मध्ये निळ्या जर्सीत दिसला होता. त्यानं भारतीय संघासाठी 103 कसोटी सामने, 236 एकदिवसीय सामने आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 417 विकेट्स घेतल्या आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 269 विकेट्सची नोंद आहे. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यानं 25 विकेट्स घेतल्या आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha