Indian Cricket Team's Throwdown Specialist Corona Positive: विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया आपल्या मुख्य खेळाडूंसह इंग्लंड दौर्यावर आहे. भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण आता या मालिकेवर कोरोनाचे ढग गडद होऊ लागलेत.
टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतनंतर आता थ्रोडाउन स्पेशलिस्ट दयानंद गरानी (Dayanand Garani) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, दयानंद गरानीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दयानंद गरानी इंग्लंड दौर्यावर भारतीय संघाचा नेट गोलंदाज देखील होता.
भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आणि थ्रोडाउन स्पेशलिस्ट दयानंद गरानी कोविड 19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून आणखी दोघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दयानंदच्या संपर्कात आलेल्या कोचिंग स्टाफचा सदस्य आणि राखीव यष्टीरक्षक वृध्दिमान साहा यालाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे चारही जण लंडनमध्ये आहेत तर उर्वरित संघ 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर संध्याकाळी डोरहॅममध्ये एकत्र येईल. लंडनहून डरहॅमला बसने जाण्यासाठी पाच तास लागतात. पंत आणि साहा 20 जुलैपासून एकत्रित काऊन्टी संघाविरुद्ध सराव सामन्यात खेळू शकणार नाही.
सध्याच्या इंग्लंड दौर्यावर विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत हा कोरोना पॉझिटिव्ह असून तो भारतीय संघासह डरहॅमला जाणार नाही. भारतीय संघ पुढील महिन्यापासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून पंतला वेगळं ठेवण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, त्याला सध्या कोणतीही लक्षणे आढळत नाही.
पंत सध्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी क्वारंटाईन असून गुरुवारी तो संघासोबत डरहॅमला जाणार नाही,” अशी माहिती सूत्रांनी दिली. पंत संघात कधी सामील होईल हे अद्याप स्पष्ट केले नाही. पंतची येत्या काही दिवसांत कोविड 19 चाचणी होणार आहे.
पंत आणि जखमी शुभमन गिल व्यतिरिक्त उर्वरित भारतीय संघ गुरुवारी लंडनहून डरहॅमला रवाना झाला. गिलला या महिन्याच्या सुरुवातीला दुखापत झाली होती. तो संघाच्या जैवसुरक्षा कवचातून बाहेर आला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यापूर्वी ब्रिटनमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय संघाला ई-मेल पाठवून तेथे कोविड 19 मधील वाढत्या प्रकरणांविषयी इशारा दिला होता. गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर खेळाडूंना ब्रेक देण्यात आला होता.