ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक देखील आयसीसीकडे सादर केलं आहे. मात्र टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळण्यास पाकिस्तानात जाणार की नाही?, हे अजूनही निश्चित झालेलं नाही. याचदरम्यान बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एक महत्वाची माहिती दिली आहे. भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा आयोजित करणे आयसीसीसाठी कठीण होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.


जय शाह (Jay Shah) 1 डिसेंबरपासून आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर देखील टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 2025 (Champions Trophy 2025) पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने ते आपल्या हातात नसल्याचा खुलासा केला. यावर सरकार निर्णय घेईल. जय शाह यांच्यासाठी हे अवघड काम असेल, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे की, सरकार जे म्हणेल ते आम्ही करू, असं या बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. 


भारत आपल्या भूमिकेवर ठाम-


भारतानं 2023 मध्ये झालेल्या आशिया कपच्या वेळी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी निमित्तानं भारत जुन्या भूमिकेवर ठाम आहे. भारतानं 2008 नंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतानं पाकिस्तानला जायचा निर्णय घेतल्यास तब्बल 16  वर्षानंतर भारतीय संघ पाकिस्तानला जाईल. भारतानं भूमिका काय ठेवल्यास हायब्रीड मॉडेलनुसार देखील सामने खेळवले जाऊ शकतात. भारतानं दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्याबाबत भूमिका घेतली आहे. पीसीबीनं भारताचे सामने लाहोरमध्ये प्रस्तावित केले होते. भारत आणि पाकिस्तान मॅच 1 मार्च 2025 रोजी प्रस्तावित करण्यात आली आहे.  


पाकिस्तानने तयार केलेल्या वेळापत्रकात काय?


आयसीसीने काही काळापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाठवलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या प्रस्तावित वेळापत्रकाला मान्यता दिली होती. त्यांच्या मते टीम इंडियाचे सर्व सामने लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जातील. वेळापत्रकानुसार भारताला बांगलादेश, न्यूझीलंड आणि पाकिस्तानसह अ गटात ठेवण्यात आले आहे. भारताने उपांत्य फेरी गाठली तरी त्याचा सामना लाहोरमध्येच होणार आहे. मात्र बीसीसीआय नेमका काय निर्णय घेणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.


संबंधित बातमी:


आयसीसीने पाकिस्तानसाठी पेटारा उघडला; जय शाह यांच्या उपस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दिला छप्परफाड पैसा!