Team India T20I Sanju Samson : संजू सॅमसन हा भारतातील सर्वात प्रतिभावान खेळाडूंपैकी एक मानला जातो. जेव्हा-जेव्हा त्याला संधी मिळत नाही, तेव्हा चाहते त्यांचा राग निवडकर्त्यांवर तसेच कर्णधार आणि प्रशिक्षकावर काढतात. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत नियमित खेळाडूंच्या अनुपस्थितीत संजूला संधी मिळाली आणि त्याने हैदराबादमध्ये संधीचे सोने केले. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याच्या बॅट शांत होती, परंतु तिसऱ्या सामन्यात त्याने कहर केला आणि भारतासाठी टी-20 मधील पहिले शतक झळकावले.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संजू सॅमसनने अवघ्या 40 चेंडूंमध्ये शतक ठोकले, जे या फॉरमॅटमधील टीम इंडियाच्या कोणत्याही फलंदाजाचे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. आपल्या डावात संजूने 47 चेंडूंचा सामना केला आणि 11 चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 111 धावांची जबरदस्त खेळी केली. गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वीच त्याचे खूप कौतुक केले होते. अशा परिस्थितीत आता सॅमसनने चांगली कामगिरी केल्याने तो काही खेळाडूंसाठी धोकाही ठरू शकतो.
अभिषेक शर्मा
स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा, ज्याने आयपीएल 2024 मध्ये कहर केला. त्याने झिम्बाब्वेमध्ये आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि दुसऱ्याच सामन्यात शतक झळकावले. मात्र, त्यानंतर त्याला फारशी कामगिरी करता आली नाही आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही तो फेल ठरला. अभिषेकने तीन डावात केवळ 35 धावा केल्या. अशा परिस्थितीत नियमित सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या आगमनानंतर केवळ एकच स्थान उरणार असून यासाठी संजू सॅमसनने आपला दावा मांडला आहे.
शुभमन गिल
संजू सॅमसनची उत्कृष्ट कामगिरीही शुभमन गिलसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. गिलला काही काळापूर्वी भारतीय टी-20 संघात नियमित स्थान मिळू लागले आहे आणि तो डावाची सुरुवातही करतो. मात्र, संजू हा अधिक आक्रमक सलामीचा पर्याय ठरू शकतो आणि सॅमसनच्या या दृष्टिकोनामुळे टीम इंडिया गिलकडे दुर्लक्ष करू शकते.
ऋषभ पंत
या यादीत ऋषभ पंतचे नाव पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल, परंतु या खेळाडूची टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंतची कामगिरी काही विशेष राहिली नाही. पंतने इतर फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. परंतु भारतासाठी टी-20 मध्ये तो अद्याप आपली छाप पाडू शकला नाही. अशा परिस्थितीत संजू सॅमसनची चांगली कामगिरी त्याच्यासाठी मोठी समस्या बनू शकते. पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेतही नसेल आणि जर सॅमसनने त्या काळात चांगली कामगिरी केली, तर संघ व्यवस्थापन त्याला नियमितपणे टी-20 संघात स्थान देण्याचा विचार करू शकते. तुफानी फलंदाजीसोबतच संजू विकेटकीपिंगही करतो, त्यामुळे तो पंतसाठी मोठा धोका ठरू शकतो.