कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात कोलंबो मधील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेली पहिली मॅच ड्रा झाली. श्रीलंकेनं (Sri Lanka) पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेट वर 230 धावा केल्या. यानंतर भारताच्या (Team India ) संघानं आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, भारताचे दोन्ही सलामीवर बाद झाल्यानंत इतर फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट गमावल्या. अखेर भारताला विजयासाठी दोन विकेट हाती असताना केवळ एक रन हवी होती. मात्र, श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका यानं शिवम दुबे आणि अर्शदीप सिंगला लागोपाठ दोन बॉलवर बाद केलं आणि मॅच ड्रॉ झाली.
भारताच्या हातून विजय का निसटला?
रोहित शर्मानं भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, शुभमन गिलं 16 धावांवर बाद झाला. यानंतर रोहित शर्मा देखील 58 धावा करुन बाद झाला. भारताच्या इतर फलंदाजांनी खेळपट्टीवर जम बसवला मात्र ते विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. विराट कोहली, अक्षर पटेल, केएल राहुल, शिवम दुबे यांनी खेळपट्टीवर जम बसवला मात्र त्यांना संघाला विजयापर्यंत संघाला नेण्यात अपयश आलं.
लागोपाठ विकेट गमावल्या
भारताचे फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावले आहेत असं वाटत असताना त्यांनी लागोपाठ विकेट गमावल्या. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे दोघे लगोलग बाद झाले. विराट कोहली 24 आणि श्रेयस अय्यर 23 धावांवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर चांगली कामगिरी करु शकला नाही. यांनतर केएल राहुल आणि अक्षर पटेल या दोघांनी भारताचा डाव सावरला. ते दोघे संघाला विजय मिळवून देतील असं वाटत असतानाच बाद झाले. केएल राहुलला वानिंदू हसरंगा यानं 31 धावांवर बाद केलं. यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये चारिथ असलंका यानं अक्षर पटेलला 33 धावांवर बाद केलं. यानंतर शिवम दुबे भारताला विजय मिळवून देईल असं वाटत असताना चारिथ असलंका यानं दोन विकेट घेत मॅच ड्रा केली.
दुनिथ वेल्लालगेची दमदार कामगिरी
दुनिथ वेल्लालगे याला दमदार कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं. श्रीलंकेचा संघ अडचणीत सापडला असताना त्यानं नाबाद 67 धावांची खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना श्रीलंकेला त्यानं दोन महत्त्वाच्या विकेट मिळवून दिल्या. शुभमन गिलला 16 धावांवर बाद करत पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला देखील 58 धावांवर त्यानं बाद केलं.
श्रीलंकेच्या कॅप्टनची दमदार गोलंदाजी
श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका यानं अक्षर पटेल, शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग यांना बाद करत श्रीलंकेचा पराभव टाळला आणि भारताला विजयापासून रोखलं.
टी 20 मालिकेतील पराभव विसरुन श्रीलंकेचा पलटवार
टी 20 मालिकेत श्रीलंकेला 3-0 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं दमदार कामगिरी करत भारताविरोधात लढत दिली.
संबंधित बातम्या :