IND vs BAN : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या अर्थात शनिवारी (10 डिसेंबर) होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला कोणत्याही किंमतीवर विजय मिळवून क्लीन स्वीपची नामुष्की ओढावण्यापासून स्वत:ला वाचवायचं आहे. यासाठी टीम कसून सराव करत असून कोच राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) प्रशिक्षणाखाली भारतीय संघ सामन्यापूर्वी चांगलाच घाम गाळत आहे. दरम्यान द्रविडही मन लावून खेळाडूंची प्रॅक्टिस घेत असून युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला राहुल बाऊन्ड्री कशी मारायची यासाठी खास अॅक्शन करुन दाखवत आहे. सराव घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून बीसीसीआयनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.


पाहा VIDEO-






कर्णधार रोहितसह कुलदीप सेनसह दीपक चाहरही बाहेर


दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्मासह भारताचा युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आणि दीपक चाहर हेही बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडले आहेत. तिन्ही खेळाडू दुखापतीशी झुंजत आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडिया तिसऱ्या वनडेत शाहबाज अहमदला संधी देऊ शकते. या मालिकेच्या पहिल्या सामन्यातच शाहबाजला अक्षर पटेलच्या जागी खेळण्याची आणि भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. याशिवाय तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही विराट कोहली शिखर धवनसह टीम इंडियासाठी सलामीची जबाबदारी सांभाळू शकतो.


कधी, कुठे होणार सामना?


भारत विरुद्ध बांगलादेश हा तिसरा एकदिवसीय सामना उद्या अर्थात 10 डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. हा सामना बांगलादेशच्या झहूर अहमद चौधरी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


हे देखील वाचा-