आशिया चषकाच्या विजयाने भारतीय संघावरील दबाव झाला कमी, विश्वचषकासाठी टीम इंडिया तयार
Team India Asia Cup 2023 : विश्वचषकाआधी भारतीय संघ आशियाचा किंग झालाय. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव केला.
Team India Asia Cup 2023 : विश्वचषकाआधी भारतीय संघ आशियाचा किंग झालाय. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव केला. या सामन्यात मोहम्मद सिराज याने सहा विकेट घेतल्या. या विजयामुळे टीम इंडियाचा विश्वचषकातील प्रवास सुकर झाल्याचे दिसतेय. पाच ऑक्टोबर २०२३ पासून भारतामध्ये विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ आठ ऑक्टोबरपासून आपल्या अभियानाला सुरुवात होत आहे. आशिया चषकाआधी भारतीय संघाच्या कामगिरीबाबत दबाव होता. मात्र आता बऱ्याच अंशी दबाव कमी झाला आहे.
5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात होणार आहे. विश्वचषकाआधी रोहित आणि कंपनीवर दबाव होता. मात्र आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर दबाव कमीच झालाय. अखेरच्या सुपर फोरच्या सामन्यात भारताचा बांगलादेशकडून ६ धावांनी पराभव झाला होता. या सामन्यात टीम इंडिया 259 धावांवर ऑलआऊट झाला होता. त्याआधी सुपर फोर सामन्यात श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया २१३ धावांवर ऑलआऊट झाला होता. हा सामना भारताने 41 धावांनी जिंकला होता, पण फलंदाजीतील अपयश चर्चेत राहिले. पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामनाही भारतासाठी काही खास नव्हता. मात्र पावसामुळे तो सामना रद्द झाला.
टीम इंडिया यंदा जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. येथे टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळली. भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली होती. वनडे मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता. वनडे मालिकेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली होती. टीम इंडियाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. भारतीय खेळाडूंना मैदानावर फलंदाजी करताना समस्यांना सामोरे जावे लागले होते. 29 जुलै रोजी बार्बाडोस येथे झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ १८१ धावांवर सर्वबाद झाला.
आशिया चषकाच्याआधी भारतीय संघाच्या विश्वचषकाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. रोहित शर्माच्या कर्णधारपद आणि फलंदाजीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. चौथ्या क्रमांकावरील फलंदाज ही टीम इंडियाची पुन्हा समस्या झाली होती. पण केएल राहुलच्या पुनरागमनाने ही समस्याही संपुष्टात आली. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात राहुलने शतक झळकावले होते.