वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताच्या 15 सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी संध्याकाळी ही माहिती दिली. 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ तयार झाले आहेत. विराट कोहली आणि केन विल्यमसन यांचे लक्ष आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स करंडक जिंकण्याकडे लागले आहे. त्याआधीच्या सराव सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली.


अंतिम सामन्यात कुणाला मिळाली संधी?


विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश आहे.






अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन


रोहित शर्मा आणि शुभमन गिल अंतिम सामन्यात ओपनिंग करु शकतात. त्यांच्यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि हनुमा विहारी मधल्या फळीला बळकटी देतील. ऋषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळू शकेल, कारण तो या क्षणी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचं तर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळतील. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाजीची भक्कम करतील. मात्र जर टीम इंडिया चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू घेऊन मैदानावर उतरली तर जाडेजाला बाहेर बसावे लागेल आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळू शकेल.


टीम इंडियाने अंतिम सामन्यासाठी  सज्ज 


भारतीय संघाने अंतिम सामन्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. अनेक दिवसांपासून टीम सतत सराव करत आहे. इंग्लंडच्या मैदानावर अधिकाधिक सराव करून खेळाडू तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतिम सामन्यादरम्यान हवामान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.