SriLanka Tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अलीकडेच श्रीलंका दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. मात्र यात कोचच्या नावाविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडियाच्या कोचची माहिती दिली आहे. राहुल द्रविड श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघाचा प्रशिक्षक असणार आहे. मात्र राहुल द्रविडला श्रीलंका दौर्‍यासाठी प्रशिक्षक म्हणून नेमले जाऊ शकते अशा अनेक बातम्या आधीच समोर आल्या होत्या.


सौरव गांगुलीने म्हटलं की, राहुल द्रविड श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघाचा प्रशिक्षक असेल. राहुल द्रविड गेल्या काही वर्षांपासून इंडिया अंडर 19 आणि इंडिया ए संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. या काळात भारताच्या युवा खेळाडूंना घडवण्याचं श्रेय त्यांनाच जातं.


शिखर धवन टीम इंडियाचा कर्णधार असणार


या काळात भारत एकाच वेळी दोन मालिका खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौर्‍यावर आहे. तिथे टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर शिखर धवनच्या नेतृत्वात आणखी एक भारतीय संघ श्रीलंकेत 13 ते 25 जुलै दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन टी -20 मालिका खेळेल. इंग्लंड दौर्‍याचा भाग नसलेल्या या खेळाडूंना श्रीलंका दौर्‍यासाठी जागा मिळाली आहे.


या दौर्‍यावर शिखर धवनला टीम इंडियाचा कर्णधार नेमण्यात आले आहे. तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला उपकर्णधार म्हणून स्थान देण्यात आले आहे. याशिवाय चेतन साकारिया, नितीश राणा, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड आणि कृष्णप्पा गौतम या तरूण चेहर्‍यांनाही प्रथमच टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले आहे.


श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ


शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.