नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कपमध्ये उद्या आमने सामने येणार आहेत.या हाय व्होल्टेज लढतीसाठी एका दिवसापेक्षा कमी कालावधी बाकी आहे. खेळाडूंपासून चाहत्यांपर्यंत सर्वांना या मॅचची प्रतीक्षा आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. टी20 वर्ल्ड कपमधील ही 19 वी मॅच असेल. रविवारी म्हणजेच उद्या भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता ही मॅच सुरु होणार आहे. या मॅचमध्ये न्यूयॉर्कचं वातावरण कसं असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारत पाकिस्तान मॅच दिवशीचा न्यूयॉर्कमधील वेदर रिपोर्ट
न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ही मॅछ सुरु होईल. हवामान विभागाच्या माहितीनुसार टॉसच्या वेळी पावसाची शक्यता 40 ते 50 टक्के असू शकते. न्यूयॉर्कमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी एक वाजेपर्यंत पावसाची शक्यता 10 टक्क्यांवर येऊ शकते. न्यूयॉर्कमधील वेळेनुसार सायंकाळी 3 वाजता पावसाची शक्यता 40 टक्क्यांवर पोहोचेल.
न्यूयॉर्कमध्ये रविवारी पावसाची शक्यता 42 टक्के वर्तवण्यात आली आहे. तर, शहरातील तापमान 25 अंश सेल्सिअस पर्यंत असेल. आर्द्रता 58 टक्क्यांपर्यंत असेल. पावसामुळं टॉसला उशीर होऊ शकतो. मात्र, मॅच वेळेवर सुरु होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचमध्ये पावसाची भूमिका महत्त्वाची असेल. याशिवाय दोन्ही संघांसाठी या मैदानावर अनुकूल स्थिती असेल. न्यूयॉर्कमध्ये भारताच्या गोलंदाजांनी आयरलँडला 96 धावांवर रोखलं होतं. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मॅचमध्ये देखील कमी धावसंख्या होती. न्यूयॉर्कचं नासाऊ काऊंटी इंटरनॅशल क्रिकेट स्टेडियम गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरलं होतं.
भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दूबे, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा,मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
पाकिस्तानचा संभाव्य संघ :पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कॅप्टन), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन शाह अफ्रिदी, हारिस रऊफ किंवा मोहम्मद आमिर, नसीम शाह, अब्रार अहमद
संबंधित बातम्या :