T20 World Cup 2024:  T20 विश्वचषक 2024 च्या साखळीत पाकिस्तानला सलामीलाच धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यजमान अमेरिकेनं बलाढ्य पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी पराभव करून नवा इतिहास घडवला. पाकिस्तानला 20 षटकांत 7 बाद 159 धावांवर रोखल्यानंतर अमेरिकेनेही 20 षटकांत 3 बाद 159 धावा केल्या. यानंतर सुपर ओव्हरमध्ये बिनबाद 18 धावा केल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला 1 बाद 13 धावांवर रोखले. कर्णधार मोनांक पटेल सामनावीर ठरला.


पाकिस्तानला पहिल्याच लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानं मोठा त्यांची सुपर-8 वाट खडतर झाली आहे. अमेरिकेच्या नवख्या संघानं अनुभवी पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं. यामुळं पाकिस्तानच्या टी20 वर्ल्ड कपमधील मोहिमेला फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफ याच्यावर Ball Tampering म्हणजेच चेंडूशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोप आता करण्यात येत आहे.


अमेरिकेच्या वरिष्ठ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा सदस्य रस्टी थेरॉनने हॅरिस रौफवर चेंडूसोबत छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. रस्टी थेरॉनने X वर लिहिले की,"ICC, पाकिस्तानी गोलंदाज चेंडूशी छेडछाड करत नाही असा समज आम्ही करून घेऊ का? दोन षटकांपूर्वी बदललेला चेंडू रिव्हर्स कसा होऊ शकतो? हॅरिस रौफने त्याच्या नखाने चेंडू कुडतडला आहे आणि त्याचे पुरावे तुम्हाला चेंडूवर दिसू शकतील.'' अमेरिकेच्या टीमकडून याबबात कोणतीच अधिकृत तक्रार करण्यात आलेली नाही, परंतु रौफवर करण्यात आलेला आरोप गंभीर असल्याचं बोललं जात आहे.






पाकिस्तानचा सुपर-8 चा मार्ग खडतर


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत 9 जूनला होणार आहे. भारत या गटातील सर्वात मजबूत संघ आहे. भारतानं पहिलं स्थान मिळवून सुपर-8 मध्ये प्रवेश केल्यास  पाकिस्तानला काही करुन दुसरं स्थान मिळवावं लागेल. पाकिस्ताननं राहिलेल्या तीन मॅच जिंकल्या तर त्यांचे सहा गुण होतील. मात्र, त्याचवेळी अमेरिकेला पुढील सर्व मॅचेसमध्ये पराभूत व्हावं लागेल. 


अमेरिकेच्या विजयामुळं भारताला सतर्क राहण्याची गरज  


टी-20 विश्वचषकात अमेरिकेनं आतापर्यंत ज्या दोन मॅच जिंकल्या आहेत. त्या दमदार कामगिरी करत जिंकल्या आहेत. अमेरिकेच्या संघात भारतीय, वेस्ट इंडिज, दक्षिणआफ्रिका, न्यूझीलँड आणि पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आहेत. हे खेळाडू कोणत्याही संघापुढं तगडं आव्हान निर्माण करु शकतात. अमेरिकेनं नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत बांगलादेशला पराभूत केलं होतं. कॅनडा आणि पाकिस्तानला टी20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेनं पराभूत केलं आहे. त्यामुळं भारतीय संघापुढे ते तगडं आव्हान निर्माण करु शकतात. भारतीय संघाला यामुळं अमेरिकेविरुद्ध सतर्क राहण्याची गरज आहे.