PAK vs AUS, T20 World Cup 2021 : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यापूर्वीच पाकिस्तानची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. विश्वचषकात दमदार कामगिरी करणारा मोहम्मद रिझवान आणि अनुभवी शोएब मलिक आजारी असल्याचं वृत्त समोर आलं आहे. रिझवान यानं विश्वचषकात बाबरला चांगली साथ दिली होती. बाबर-रिझवान यांनी पाकिस्तान संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली होती. शोएब मलिक याच्यामुळे पाकिस्तान संघाच्या मधल्या फळीला ताकद मिळाली होती. मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक यांना बुधवारी सकाळी ताप आला होता. त्यामुळे त्यांनी ट्रेनिंगमध्येही सहभाग घेतला नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, दोघांची कोरोना चाचणीही झाली. पाकिस्तानच्या सुदैवानं ही चाचणी निगेटिव्ह आली. पाकिस्तान संघ व्यवस्थापनाला दोघांच्याही खेळण्याची आपेक्षा आहे. मात्र, सामन्यापूर्वी त्यांच्या पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर दोघांच्या खेळण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
कोण घेणार जागा?
यूएई येथे सुरु असलेल्या विश्वचषकात पाकिस्तान संघानं दमदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील पाचही सामन्यात विजय मिळवत पाकिस्तान संघानं एकहाती उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. साखळी सामन्यात रिझवान आणि मलिक यांनी संघासाठी मोलाची कामगिरी केली. जर उपांत्य सामन्यात खेळू शकले नाहीत, तर पाकिस्तानच्या संघाला त्यांची उणीव नक्कीच जाणवेल. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तान संघ व्यवस्थापनानं माजी कर्णधार सर्फराज अहमद आणि हैदर अली यांना तयार राहण्यास सांगितलं आहे. रिझवान आणि मलिक यांची तब्येत ठीक न झाल्यास हे दोन्ही खेळाडू आज खेळताना दिसू शकतात.
पाकिस्तानचा विजयरथ ऑस्ट्रेलिया रोखणार का?
आज, गुरुवारी टी20 विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये उपांत्य सामन्यात लढाई होणार आहे. अजेय पाकिस्तान संघासमोर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान असणार आहे. साखळी फेरीत पाकिस्तान संघानं एकही पराभव स्विकारला नाही. 2016 मध्ये साखळी फेरीत गारद होणाऱ्या पाकिस्तान संघानं यूएईत सुरु असलेल्या स्पर्धेत दमदार कामगिरी करत सर्वांनाच चकीत केलं आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या स्पर्धेत पराभव न स्वीकारणारा पाकिस्तान एकमेव संघ आहे. दुसरीकडे 2010 प्रमाणे ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत पाकिस्तानवर मात करणार का? भारताचा 10 गड्यांनी पराभव करत पाकिस्तान संघानं दिमाखात विश्वचषकाची सुरुवात केली होती. त्यानंतर न्यूझीलंड, अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलँड यांच्यावर विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पटकावलं. ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीत परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. पण दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजला हरवून नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियानं टी20 विश्वचषकावर नाव कोरलं होतं, याची पुनारवृत्तीसाठी ऑस्ट्रेलियाही सज्ज आहे. मात्र, त्यांच्यासमोर पाकिस्तानचं आव्हान आहे.
आकडे काय सांगतात?
ऑस्ट्रलिया आणि पाकसितान आतापर्यंत 23 टी20 सामन्यात आमनेसामने आले आहेत. यापैकी 13 सामन्यात पाकिस्तान संघानं बाजी मारली आहे. तर फक्त 9 सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आलेला आहे. एका सामन्यात निकाल लागला नव्हता. आकडे पाकिस्तान संघाच्या बाजूनं असले तरी उपांत्य सामन्यात विजय कसा मिळवयचा हे ऑस्ट्रेलियाला चांगलेच माहित आहेत. यंदा पाकिस्तानचा संघही फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे उपांत्य सामना रोमांचक होईल.