मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं यंदाच्या वर्षात खेळवण्यात येणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी बॅकअप प्लान आखण्यास सुरुवात केली आहे. बीसीसीआयनं टी20 विश्वचषकाच्या काही सामन्यांच्या आयोजनाबाबत ओमान क्रिकेटसोबत चर्चा सुरु केली आहे. ओमान क्रिकेटमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं यासदंर्भात माहिती दिली आहे. आयसीसीनं या आठवड्यात बीसीसीआयला टी20 विश्वचषक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यासंदर्भात माहिती देण्यास सांगितलं होतं. त्यासाठी बीसीसीआयला एक महिन्याचा कालावधीही आयसीसीच्या वतीनं देण्यात आला होता. टी20 विश्वचषकाच्या आयोजनासंदर्भात माहिती देताना युएई, ओमानचा पर्याय आयसीसीसमोर ठेवला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा कमी झाला असला तरी मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच भारतात टी20 विश्वचषकाचं आयोजन करणं तसं अवघड होणार आहे. त्यामुळे आयसीसीनं टी20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी प्लान बी तयार ठेवला असून गरज भासल्यास यूएईला आयोजनासाठी तयार राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत विश्वचषकातील काही सामन्यांच्या आयोजनासाठी इतर देशांशी चर्चा करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळत आहे.  


दरम्यान, टी20 विश्वचषकाचं आयोजन जरी दुसऱ्या देशात झालं तरी आयोजनाचे सर्व अधिकार बीसीसीआयकडेच असणार आहेत. ओमान क्रिकेटचे सचिन मधून जेसरानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आयसीसीनं आमच्याशी संपर्क साधला आहे आणि ओमान क्रिकेटचे अध्यक्ष पंकज खिमजी, बीसीसीआयसोबत चर्चा करत आहेत."


टी20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी बीसीसायची ओमान क्रिकेटशी चर्चा सुरु 


ओमान विश्वचषकाच्या आयोजनासाठी पूर्णपणे तयार आहे. जेसरानीनं पुढे बोलताना सांगितलं की, "बीसीसीआयसोबत चर्चा सुरु आहे. आयसीसीनं आमच्याकडे काही माहिती मागितली आहे. ती आम्ही त्यांना दिली आहे. तसेच आम्ही टी20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी पूर्णपणे तयार असल्याची माहिती आयसीसीला दिली आहे."


ओमान यंदाच्या वर्षी टी20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 16 संघांपैकी एक आहे. या देशात क्रिकेट पूर्णपणे व्यवसाय म्हणून खेळलं जातं. याची देखरेख खिमजी रामदास करतात, जे भारयीस वंशाचे व्यावसायिक आहे. जेसरानी यांनी सांगितलं की, "बीसीसीआयला विश्वचषकाचं आयोजन करण्यासंदर्भात अंतिम निर्णय कळवण्यासाठी 28 जूनपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. तोपर्यंत ओमान क्रिकेटला वाट पाहावी लागणार आहे."