मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, सहसा हे त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. मागील काही वर्षांपासून संघात आलेला हा फिटनेसचा ट्रेंड सध्या चांगलाच स्थिरावत आहे. यामध्येच काही क्रिकेटपटू हे तर अनेकांच्या आदर्शस्थानी आहेत. याच खेळाडूंमधील एक नाव म्हणजे, क्रिकेटपटू विराट कोहली याचं.
अंडर 19 पासून ते आता, संघाचं कर्णधारपद भूषवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विराटनं स्वत:मध्ये परिस्थितीनुरुप महत्त्वाचे बदल केले. शारीरिक सुदृढता, खेळाचं स्वरुप या साऱ्यासोबतच त्यानं खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या. मागे एका मुलाखतीदरम्यान, त्यानं आपल्या आहाराच्या सवयींचा उलगडा केला होता, त्यावेळी तो विगन असल्याची बाब समोर आल्याचा अनेकांचाच दावा.
पण, याच विराटनं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर झालेल्या 'आस्क मी एनिथिंग' सेशनमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत सांगताना अंडही खात असल्याची कबुली दिली. आणि बस्स... मग काय, त्याच्या या एका प्रश्नाच्या उत्तरानं अनेक क्रीडारसिक नाराज झाले.
डाएटमध्ये नेमकं काय सेवन करतो अशा आशयाच्या प्रश्नाचं उत्तर देताना, आपण खूप साऱ्या भाज्या, काही अंडी, 2 कप कॉफी, क्विनोआ, खूप सारा पालक यांचं सेवन करतो शिवाय डोसाही आवडतो, असं त्याने सांगितलं. पण, या साऱ्याचं प्रमाणशीर सेवन करण्यावरच आपला भर असतो, असंही त्याने न विसरता सांगितलं.
विराटच्या या उत्तराचा स्क्रीनशॉट काढत अनेक क्रीडारसिकांनी विराटच्या त्या मुलाखतीची आठवण करुन दिली. जिथं केविन पीटरसनसोबतच्या इन्स्टाग्राम चॅटची आठवण करुन दिली. जिथं त्यानं विगन होण्याची कारणं स्पष्ट केली होती.
Virat Kohli Look | विराट कोहलीचा नवा लूक पाहून चाहत्यांना 'मनी हाईस्ट'मधल्या प्रोफेसरची आठवण
पाठीच्या कण्याचा त्रास असल्यामुळं त्याचे थेट परिणाम एका बोटावर होत असून, फलंदाजी करताना त्यावर याचे परिणाम होतात. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना 2018 मध्ये हा त्रास जाणावला होता. पुढे मला अॅसिडीटीचा त्रास जाणवू लागला, शरीरातील हाडांमध्ये असणारं कॅल्शियम कमी होऊ लागलं, ज्यामुळे पाठीच्या मणक्याचा त्रास जाणवू लागला, त्यामुळे मी मांसाहार बंद केला असं सांगत आपल्याला आता बरं वाटत असल्याचं विराट म्हणाला होता.
विराटचे हे उदगार आणि त्यानंतर आता त्यानं दिलेली ही कबुली पाहून क्रीडारसिक निराश झाले. जे पाहून अखेर खुद्द विराटने एक ट्विट करत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. मी कधीच विगन असल्याचा दावा केला नव्हता. मी कायम सांगत आलोय की मी शाकाहारी आहे, दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या भाज्या घ्या (जर खाव्याश्या वाटत असतील तर), असं त्याने स्पष्ट केलं. तेव्हा आता विराटच्या या उत्तरावर त्याचे फॉलोअर्स नेमकी कशी प्रतिक्रिया देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.