T20 World Cup 2026 Shubhman Gill: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेसाठी (ICC T20 World Cup 2026) 20 डिसेंबरला टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने पत्रकार परिषद घेऊन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये महत्वाचे म्हणजे, शुभमन गिलला (Shubhman Gill) टी-20 विश्वचषकाच्या संघातून वगळण्यात आले आहे. मात्र याचदरम्यान शुभमन गिलबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
एका वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar), मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी शुभमन गिलला संघातून वगळण्याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. मात्र वैद्यकीय पथकाने शुभमन गिलची दुखापत गंभीर नसल्याचे ठरवले. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पाचवा टी-20 सामना शुभमन गिल (Shubhman Gill) खेळू शकत होता, अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे शुभमन गिलसोबत धोका झाला की काय, अशी चर्चा सध्या रंगली आहे. दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादव देखील खराब फॉर्ममध्ये आहे, परंतु त्याचे कर्णधारपद किमान विश्वचषकापर्यंत कायम राहील.
शुभमन गिलला वगळल्यानंतर अजित आगरकर काय म्हणाले? (Ajit Agarkar On Shubhman Gill)
शुभमन गिलला विश्वचषकाच्या टी-20 संघातून वगळण्याबाबत स्पष्टीकरण देताना निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर म्हणाले, शुभमन एक दर्जेदार खेळाडू आहे, यात शंका नाही. मात्र, संघाचे संतुलन आणि संयोजन राखणे अधिक महत्त्वाचे असते. संघ निवडीत कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि एखाद्या खेळाडूला बाहेर बसावे लागते.शुभमन जेव्हा कसोटी सामन्यांमध्ये व्यस्त होता, तेव्हा अक्षर पटेलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. आम्हाला असा यष्टीरक्षक हवा होता जो सलामीला फलंदाजी करू शकेल, त्यामुळे जितेशचा विचार झाला. तसेच, रिंकू सिंगच्या समावेशामुळे खालच्या फळीत संघाला अधिक मजबुती मिळेल. शुभमनचे बाहेर राहणे दुर्दैवी असले, तरी संघाच्या गरजेनुसार हा निर्णय घ्यावा लागला, असं अजित आगरकरांनी स्पष्ट केलं.
T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ: (Team India Squad T20 World Cup 2026)
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, इशान किशन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा.