T-20 World Cup 2024: गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी क्रिकेट संघात (Pakistan Cricket Team) अनेक बदल झाले. बाबर आझम पुन्हा कर्णधार बनला आहे, गॅरी कर्स्टनला मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. याशिवाय पाकिस्तानी खेळाडूही विचित्र पद्धतीने फिटनेस ट्रेनिंग करताना दिसले, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता दिग्गज क्रिकेटर आणि पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. नुकतेच पाकिस्तान संघाचा आयर्लंडकडून 5 विकेट्सने पराभव झाला होता. याच पार्श्वभूमीवर रमीझ राजाने पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष रमीझ राजा म्हणाले की, "संघाचे संयोजन योग्य नसताना पाकिस्तान विश्वचषक कसा जिंकेल? सलामी जोडीचा अद्याप पत्ता नाही, सेट झालेले फलंदाज निष्काळजीपणे विकेट गमावत आहेत आणि मधली फळी चांगली कामगिरी करत नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार, पाकिस्तान उपांत्य फेरीत कसे पोहोचू शकेल?, मला तर आता असे वाटते की, पाकिस्तानचा संघ ट्वेंटी-20 विश्वचषकात अमेरिकेकडून देखील पराभूत होऊ शकतो. त्यांचा संघ पाकिस्तानला आव्हान देईल यात शंका नाही. कारण त्यांच्याकडे अनेक भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आहेत.
पाकिस्तान संघाची एका वर्षात वाईट अवस्था
याशिवाय रमीझ राजा म्हणाला की, पाकिस्तान संघ आयर्लंडविरुद्धच्या धावसंख्येचा बचाव करू शकत नाही. कर्णधार बदलापूर्वी संघाची कामगिरी चांगली होती. विश्वचषकाच्या वर्षात संघाची क्रमवारी सातवर गेली आहे. हे पाकिस्तानी संघाची खरी स्थिती सांगत आहे, असं रमीझ राजा म्हणाले. पाकिस्तान संघाने 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 2 टी-20 मालिका खेळली होती, ज्यामध्ये त्यांना एकदा 4-1 ने पराभवाचा सामना करावा लागला होता आणि दुसरी मालिका 2-2 अशी बरोबरीत होती. सध्या पाकिस्तान संघाची अवस्था खूपच बिकट दिसत आहे.
भारत आणि पाकिस्तान एकाच गटात -
टी-20 विश्वचषक 2024 1 जूनपासून सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. अ गटात समाविष्ट असलेला भारत 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तान आपल्या मोहिमेची सुरुवात 6 जून रोजी अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने करेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 9 जून रोजी होणार आहे.