T20 World Cup 2024 Mitchell Starc: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा मिचेल स्टार्क (Mitchell Starc) विश्वचषक इतिहासातील महान गोलंदाज ठरला आहे. एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज मिचेल स्टार्क ठरला. त्याने श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला मागे टाकले आहे. मलिंगाने आपल्या कारकिर्दीत विश्वचषक खेळताना 94 विकेट्स घेतल्या होत्या. आता मिचेल स्टार्कने त्याला मागे टाकत 95 विकेट्सचा टप्पा गाठत विश्वविक्रम नोंदवला आहे.
मिचेल स्टार्कने टी20 विश्वचषक 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हा विश्वविक्रम केला आहे. टी20 विश्वचषक 2024 चा 44 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. हा सुपर-8 स्टेजचा सामना होता, ज्यामध्ये स्टार्कने तन्झीद हसनला बोल्ड केले आणि त्याच्या कारकिर्दीतील विश्वचषकातील 95 क्रमांकाची विकेट घेतली. सामन्याच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्टार्कने तनजीदला बाद केले होते.
मिचेल स्टार्कने विश्वचषकामध्ये मलिंगापेक्षा कमी डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. मलिंगाने विश्वचषकातील 59 डावांत 94 विकेट घेतल्या होत्या, तर स्टार्कने केवळ 52 डावांत 95 विकेट घेतल्या होत्या. बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. शाकिबने 75 डावात 92 विकेट घेतल्या आहेत.
विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्याची यादी-
मिचेल स्टार्क- 52 डाव- 95 विकेट्स
लसिथ मलिंगा- 59 डाव- 94 विकेट्स
शकीब अल हसन- 75 डाव- 92 विकेट्स
ट्रेंट बोल्ट- 47 डाव- 87 विकेट्स
मुथय्या मुरलीधरन- 48 डाव- 79 विकेट्स
टीम सौदी- 47 डाव- 77 विकेट्स
ग्लेन मॅकग्रा (फक्त एकदिवसीय विश्वचषक) – 39 डाव – 71 विकेट्स
मोहम्मद शमी- 32 डाव- 69 विकेट्स
शाहिद आफ्रिदी- 58 डाव-69 विकेट्स
ॲडम झाम्पा- 34 डाव- 62 विकेट्स.
मिचेल स्टार्कची कामगिरी-
मिचेल स्टार्कने आतापर्यंत 121 एकदिवसीय आणि 63 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या 121 डावांमध्ये त्याने 22.96 च्या सरासरीने 236 विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याचे सर्वोत्तम आकडे 6/28 आहेत. याशिवाय, त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 63 डावांमध्ये 23.88 च्या सरासरीने 76 बळी घेतले आहेत, ज्यामध्ये त्याचा सर्वोत्तम कामगिरी 4/20 अशी आहे.
यंदाच्या टी-20 विश्वचषकामधील पहिली हॅट्रिक-
ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने (Pat Cummins) यंदाच्या टी-20 विश्वचषकात एक भीमपराक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 2024 मधील टी-20 विश्वचषकात हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सुपर-8 मधील सामन्यात पॅट कमिन्सने ही कामगिरी केली. पॅट कमिन्सने महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन आणि तौहीद हिरदॉयला बाद केले.