T20 World Cup 2024 Ind vs Aus: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) सुपर-8 च्या फेरीत काल भारत आणि ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) सामना झाला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयात रोहित शर्मा, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी सर्वात मोठे योगदान दिले. रोहितने 41 चेंडूत 92 धावांची झंझावाती खेळी खेळली, तर कुलदीप यादवने मधल्या षटकांमध्ये येऊन 2 महत्त्वाचे बळी घेतले. तर अर्शदीप सिंगने देखील भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
अर्शदीप सिंगने भारताकडून पहिले षटक टाकले. या पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला आपल्या जाळ्यात फसवत झेलबाद केले. यानंतर कर्णधार मिचेल मार्शच्या रूपाने ऑस्ट्रेलिया संघाला दुसरा धक्का बसला. अक्षर पटेलने मिचेल मार्शचा अप्रतिम झेल घेतला. त्याच्या या झेलचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच क्रिकेटमधील अनेक आजी-माजी दिग्गजांनी अक्षर पटेलने घेतलेला झेल फक्त यंदाच्या विश्वचषकाचा नाही, तर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल असल्याचं बोलत आहे.
भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅविस हेड पुन्हा एकदा भारतीयांसाठी डोकेदुखी ठरला. त्याने 43 चेंडूंत 9 चौकार व 4 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. तो खेळत असेपर्यंत कांगारू विजयी मार्गावर होते. मात्र, 17व्या षटकात जसप्रीत बुमराहने त्याला झेल बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकविला. कर्णधार मिचेल मार्शने 28 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 37, तर ग्लेन मॅक्सवेलने 12 चेंडूंत 2 चौकार व एका षटकारासह 20 धावा केल्या.
भारताचा डाव कसा राहिला?
नाणेफेक गमावल्यानंतर भारत प्रथम फलंदाजीला आला. विराट कोहली शून्य धावांवर बाद झाला असला तरी रोहित शर्माने 41 चेंडूत 92 धावांची खेळी खेळून दाखवला. त्याने आपल्या डावात 7 चौकार आणि 8 षटकार मारले आणि यादरम्यान त्याने मिचेल स्टार्कच्या याच षटकात 4 षटकारही मारले. सूर्यकुमार यादवनेही तुफानी खेळी करत 16 चेंडूत 31 धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी मिळून टीम इंडियाची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली. हार्दिकने 17 चेंडूत 27 तर दुबेने 22 चेंडूत 28 धावा केल्या.
टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकार -
हिटमॅन रोहित शर्माने टी20 क्रिकेटमध्ये मोठा माईलस्टोन पार केला. टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकारांचा पल्ला पार कऱणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरलाय. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ख्रिस गेलच्या नावावर 174 षटकारांची नोंद आहे.
सर्वात वेगवान अर्धशतक -
रोहित शर्माने 2024 टी20 विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम अमेरिकेच्या अॅरोन जोन्स याच्या नावावर होता. रोहित शर्माने फक्त 19 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. हे टी20 विश्वचषक 2024 मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.
2024 टी20 विश्वचषकातील सर्वात वेगवान अर्धशतक
रोहित शर्मा - 19 चेंडू
अॅरोन जोन्स - 22 चेंडू
क्विंटन डी कॉक - 22 चेंडू
मार्कस स्टॉयनिस - 25 चेंडू
शाय होप - 26 चेंडू