India vs Australia, T20 World Cup 2024भारताने दिमाखात टी-ट्वेन्टीची सेमी फायनल गाठलीय. भारताने समोर ठेवलेल्या 206 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑसी टीमला 20 षटकांत सात बाद 181 धावांवर रोखलं. अर्शदीपने तीन तर कुलदीपने दोन विकेट्स काढत कांगांरुंना ब्रेक लावला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेव्हिस हेडच्या 43 चेंडूंमधील 76 धावांच्या झंझावाती खेळीने वनडे वर्ल्डकपच्या फायनलच्या  आठवणी जाग्या केल्या खऱ्या. मात्र बुमराने त्याचा अडसर दूर केल्यावर सामना भारताच्या दृष्टिपथात आला. आता भारताची सेमी फायनलमध्ये इंग्लंडशी गाठ पडणार आहे. त्याआधी आज भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या आतषबाजीनं सेंट ल्युशियाचं डॅरेन सॅमी स्टेडियम निनादून गेलं. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या सुपर एट साखळीत भारतीय कर्णधारानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढलं. पण या सामन्यात रोहित शर्माचं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं.…


उपांत्य फेरीत इंग्लंडशी लढत - 


भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा सामना 27 जून रोजी इंग्लंडविरोधात होणार आहे.  गुरुवारी संध्याकाळी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.  अ ग्रुपमध्ये भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे, टीम इंडिया विश्वचषकात अद्याप अजेय आहे. 27 तारखेला पावसाने खोडा घातला तर भारतीय संघ थेट फायनलमध्ये दाखल होईल.


भारताने बदला घेतला - 


टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला. 2023 वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. त्याची खंत भारतीयांच्या मनात होतीच. त्याचा बदला आज रोहित शर्मा अॅण्ड कंपनीने घेतला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारताविरोधात झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियावर स्पर्धेबाहेर जाण्याचं संकट ओढावले आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात येईल. 


हेड एकाकी लढला - 


भारताने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड याने एकाकी झुंज दिली. त्याने 43 चेंडूमध्ये 76 धावांची वादळी फलंदाजी केली. हेड याने चार षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 76 धावांचा पाऊस पाडला. हेड याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार मिचेल मार्श याने 37 धावांचे योगदान दिले, त्याने 28 चेंडूमध्ये दोन षटकार आणि तीन चौकार ठोकले. ग्लेन मॅक्सवेल यानं 12 चेंडूत 20 धावांची खेळी केली. हेड आणि मार्श यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. डेविड वॉर्नर, मार्कस स्टॉयनिस, टीम डेविड, मॅथ्यू वेड यांना मोठी खेळी करता आली नाही. 


भारताकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव याने 4 षटकात 24 धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 


रोहित शर्माची वादळी फलंदाजी - 


त्याआधी प्रथम फलंदाजी करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या आतषबाजीनं सेंट ल्युशियाचं डॅरेन सॅमी स्टेडियम निनादून गेलं. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या सुपर एट साखळीत भारतीय कर्णधारानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढलं. पण या सामन्यात रोहित शर्माचं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं. त्यानं 41 चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांसह 92 धावांची खेळी उभारली. विराट कोहलीचा अपवाद वगळता भारताच्या इतर फलंदाजांनीही धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. त्यामुळंच भारताला वीस षटकांत पाच बाद 205 धावांची मजल मारता आली.