T20 World Cup 2024 IND vs AFG: टी20 विश्वचषक 2024 मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात बारबाडोसमध्ये सुपर 8 चा सामना होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीमनं ग्रुप स्टेजमध्ये सर्व मॅच जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश केला होता. भारत आणि कॅनडा मॅच पावसामुळं रद्द करण्यात आली होती. भारत विरुद्ध अफगाणिस्तान मॅचकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सुपर 8 मध्ये भारताच्या तीन मॅच होणार आहेत. यापैकी दोन मॅच जिंकल्यातरी भारतीय संघ उपांत्य फेरीच्या लढतीत पोहोचणार आहे. यामुळं भारताला आजच्या मॅचमध्ये विजय आवश्यक आहे.


बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे भारत आणि अफगाणिस्तानचा सामना होणार आहे. स्थानिक वेळेनुसार हा सामना सकाळी 10.30 वाजता सुरू होईल, तर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. टीम इंडियाला ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध खेळायचा होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यातही पाऊस बॅटिंग करणार की काय?, अशी चर्चा रंगली आहे.






बार्बाडोसमध्ये हवामान कसे असेल?


Weather.com नुसार, बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे ढगाळ वातावरण असू शकते. मात्र, सामन्यादरम्यान म्हणजेच सकाळी 10 च्या सुमारास पावसाची शक्यता 10 ते 20 टक्केच आहे. मात्र, ही संधी 1 वाजेपर्यंत 50 टक्के असेल. चाहत्यांना पूर्ण सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाहता येईल, अशी आशा आहे. सामन्यादरम्यान तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. 


भारत आणि अफगाणिस्तानची ग्रुप स्टेजमध्ये दमदार कामगिरी-


भारत आणि अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव केला. मात्र, कॅनडाविरुद्धचा त्यांचा चौथा सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरे म्हणजे, अफगाणिस्तानने पहिल्या तीन सामन्यांमध्ये युगांडा, न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांचा पराभव केला आणि शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 104 धावांनी पराभव पत्करावा लागला.


राहुल द्रविड काय म्हणाले?


अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचपूर्वी राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाले की आपल्या सर्वांना माहिती आहे अफगाणिस्तान या फॉरमॅटमधील सर्वात धोकादायक टीम आहे. अफगाणिस्ताननं टी 20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. अफगाणिस्तानला इतर फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा फारसा अनुभव नसेल. मात्र, त्यांच्या खेळाडूंनी अनेक टी20 लीगमध्ये बरेच क्रिकेट खेळलं आहे. त्यांच्या तुलनेत आपल्या काही खेळाडूंकडे तसा अनुभव कमी आहे, असं राहुल द्रविड यांनी सांगितलं.  


संबंधित बातमी:


RSA vs USA:  दक्षिण आफ्रिकेची सुपर 8 मध्ये विजयी सलामी, नवख्या अमेरिकेनं झुंजावलं