RSA vs USA:  क्विंटन डी कॉकचं अर्धशतक आणि कगिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेनं अमेरिकेचा 18 धावांनी पराभव केला. अमेरिकेकडून अँड्रू घौस यानं एकतर्फी झुंज दिली. त्यानं नाबाद 80 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा यानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. 


195 धाावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  अमेरिकेनं शानदार सुरुवात केली. स्टिव्हन टेलर आणि अँड्रू घोस यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. रबाडाने टेलरला बाद करत पहिलं यश मिळवून दिले. टेलरने 14 चेंडूत 24 धावांची खेळी केली, यामध्ये एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. टेलर बाद झाल्यानंतर अमेरिकेनं लागोपाठ विकेट फेकल्या. 


नितीश कुमार याला फक्त आठ धावाच करता आल्या. कर्णधार अॅरोन जोन्स याला खातेही उघडता आले नाही. केशव महाराज यानं त्याचा अडथळा दूर केला. अनुभवी कोरी अँडरसन याला 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावाच काढता आल्या. एस जहांगिर फक्त तीन धावा काढून बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना अँड्रू घोस मात्र दुसऱ्या बाजूला शानदार फलंदाजी करत होता. त्यानं एकट्यानं लढा दिला. 


अँड्रू घोस याला हरमीत सिंह यानं चांगली साथ दिली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या तोंडंचं पाणी पळवलं होतं. 12 षटकात फक्त 28 धावांची गरज होती, त्यावेळी अनुभवी रबाडाने भेदक मारा केला. रबाडाने हरमीत सिंह याला बाद करत सामना फिरवला. रबाडाने या षटकात फक्त दोन धावा खर्च करत जम बसलेल्या हरमीत सिंह याला बाद केले. अँड्रू घौस यानं एकतर्फी झुंज दिली. त्यानं 46 चेंडूमध्ये नाबाद 79 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये त्यानं 5 चौकार आणि पाच षटकार ठोकले. गौस याला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली नाही, त्याचा फटका अमेरिकाला बसला. 






दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रडाबा यानं भेदक मारा केला. त्यानं चार षटकात फक्त 18 धावा खर्च केल्या. त्यानं तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.  केशव महाराज, एनरिक नॉर्खिया आणि तरबेज शम्सी यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 


क्विंटन डी कॉकचं शानदार अर्धशतक 


दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 4 विकेटच्या मोबदल्यात 194 धावांचा डोंगर उभारला. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने शानदार अर्धशतकं ठोकलं. डी कॉकने 40 चेंडूत 74 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 5 षटकारही लगावले. तर क्लासेनने 18 चेंडूत 26 धावांची झंझावती खेळी खेळली. त्याच्याशिवाय कर्णधार एडन मार्करामचे अर्धशतक हुकले, त्याने 32 चेंडूत 46 धावा केल्या. डेथ ओव्हर्समध्ये क्लासेन आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी 50 धावांच्या भागीदारी केली. या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला 190 च्या पुढे नेले. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावलकर आणि हरमीत सिंग यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.


सौरभ नेत्रावळकरही चमकला


भारतीय वंशाचा यूएसएचा सौरभ नेत्रावलकरने विश्वचषकात शानदार गोलंदाजी करत सर्वांनाच प्रभावीत केले.  भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या विकेट घेतल्या होत्या. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 4 षटकांत केवळ 21 धावा देत 2 महत्त्वाचे विकेट्स घेतल्या. नेत्रावळकरने आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याचा अडथळा दूर केला, त्याशिवाय हेंड्रेकिसलाही बाद केले.