T20 World Cup 2024: सध्या क्रिकेट विश्वात IPL 2024 ची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम 26 मे रोजी संपणार आहे. मात्र त्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 सुरू होणार आहे.
आगामी विश्वचषकात भारतीय संघातून कोणत्या खेळाडूंना संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 4 सदस्यांची निवड समिती आयपीएल 2024 च्या सामन्यांवर सतत लक्ष ठेवून आहे. ते सामने थेट पाहण्यासाठी मैदानावरही पोहोचत असल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने एक महत्वाचं विधान केलं आहे.
आगामी टी-20 विश्वचषकात भारतासाठी कोणता खेळाडू गेमचेंजर ठरेल, याबाबत युवराज सिंगने भाष्य केलं आहे. गेम चेंजर्स म्हणून हार्दिक पांड्या किंवा जडेजा आणि रिंकूचे नाव घेतले नाही, तर चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा शिवम दुबे याचं नाव पुढे केलं आहे. युवराजने आयपीएलमध्ये फॉर्मात असलेल्या ३० वर्षीय शिवम दुबेचे कौतुक केले आहे.
टी-20 विश्वचषकात शिवम दुबेचा संघात समावेश करण्याचे युवराजने सुचवले आहे. युवराजने ट्विटरवर लिहिले, शिवमला पाहून आनंद झाला. तो सहज षटकार मारतो. मला वाटतं की तो विश्वचषकाच्या संघात असावा. त्याच्यात गेम चेंजर होण्याची क्षमता आहे, असं युवराज म्हणाला. 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत युवराजने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
भारतीय संघ कधी जाहीर होणार?
पीटीआयनुसार, भारतीय संघाची निवड समिती आयपीएल 2024 चा पहिला टप्पा संपल्यानंतर 15 खेळाडूंचा संघ जाहीर करेल. तोपर्यंत निवडकर्त्यांना खेळाडूंच्या फॉर्मची कल्पना आली असेल. आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचू न शकलेल्या संघातून निवडलेले खेळाडू लवकरच अमेरिकेला रवाना होईल. गेल्या वर्षी डब्ल्यूटीसी फायनलसाठीही असेच काहीसे करण्यात आले होते.
पात्र ठरलेले 20 संघ...
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
गटवारी
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा
संबंधित बातम्या:
IPL 2024: आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांमध्ये स्पष्ट झाले; हे 2 संघ प्लेऑफमध्ये नक्की पोहचणार!