Virat-Rohit DRS : अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजाचा पराभव केला. भारतीय संघाचा हा 1000 वा एकदिवसीय सामना होता. सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पराभव केला. नियमीत कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच एकदिवसीय मालिका आहे. या मालिकेआधी विराट कोहलीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडलं होतं. तसेच गेल्या काही दिवसांपासून रोहित आणि विराट कोहलीमध्ये वाद असल्याचे बोललं जात आहे. पण आज झालेल्या एका प्रसंगानंतर विराट आणि रोहितचा वाद आहे, असे म्हणणाऱ्यांना उत्तर मिळाले आहे. 


विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांनी आपल्यामध्ये कोणताही वाद नसल्याचे अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे. तरीही या दोघांमध्ये वाद असल्याच्या चर्चा आणि बातम्या वाऱ्यासारख्या पसरत होत्या. मात्र, अशा बातम्या पसरवणाऱ्यांना आजच्या सामन्यानंतर उत्तर मिळाले असेल. विराट आणि रोहित शर्मा यांच्यातील मैदानावरील प्रसंगाचा एक व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये माजी कर्णधार विराट कोहली कर्णधार रोहित शर्माला सल्ला देताना दिसत आहे. रोहित शर्मानेही विराटचा सल्ला घेतला.  


झालं असे की, वेस्ट इंडीजची फलंदाजी सुरू होती, यजुवेंद्र चहल 22 व्या षटक घेऊन आला होता. पाचव्या चेंडूवर शमारह ब्रूक्सविरुद्ध भारतीय खेळाडूंनी बादची अपील केले. अंपायरने नाबाद असल्याचे ठरवले. त्यावेळी भारतीय खेळाडूंनीही तिसऱ्या पंचाकडे दाद मागण्यासाठी एकमेंकामध्ये संवाद सुरु केला.  त्यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये यावरुन संवाद झाला. रोहितने विराटकडे क्या है, आउट है?” अशी विचारणा केली. त्यावर मेरे हिसाब से आउट है, असे उत्तर विराट कोहलीने दिले. विराट कोहलीने सल्ला दिल्यानंतर रोहित शर्माने एका क्षणाचीही विलंब न करता डीआरएसची मागणी केली. तिसऱ्या पंचाच्या निर्णायामध्ये खेळाडू बाद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मैदानावरील पंचांना आपला निर्णय बदलावा लागला.  


पाहा व्हिडीओ - 






भारताचा सहा विकेट्सने विजय
सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना हात खोलण्याची संधी दिलीच नाही. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा जेसन होल्डर (57) याने केल्या असून कर्णधार पोलार्डतर शून्यावर बाद झाला. ज्यामुळे संघ 43.5 ओव्हरमध्ये 176 धावांच करु शकला आहे. भारताकडून युझवेंद्र चहलने 4, सुंदरने 3, प्रसिधने 2 आणि सिराजने 1 विकेट घेतली. ज्यानंतर 177 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून रोहित आणि इशान यांनी उत्तम सुरुवात केली. पण अर्धशतक होताच 60 धावांवर रोहित बाद झाला. त्यानंतर इशान (28), कोहली (8), पंत (11) हे पटापट तंबूत परतले. पण नंतर सूर्यकुमार यादव (नाबाद 34) आणि दीपक हुडा (नाबाद 26) यांनी अखेरपर्यंत क्रिजवर टीकत राहून भारताचा विजय पक्का केला.