T20 World Cip 2021: टी-20 विश्वचषकात भारताकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळले. या दोन्ही सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागलाय. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. सलग दोन पराभवानंतर भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा आता धुसूर झाल्यात. ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते नाराज झालेत. मात्र, याचदरम्यान विराट कोहलीच्या मुलीला आणि कुटुंबाला धमकी दिल्याची बाब समोर आलीय. यावर पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने (Inzamam-ul-Haq) संतापजनक प्रतिक्रिया दिलीय.
सोशल मीडियावर या विकृतांनी विराटवर राग व्यक्त करताना त्याच्या दहा महिन्यांच्या मुलीलाही सोडले नाही. सोशल मीडियावर अनेकांनी विराटच्या मुलीवर अर्वाच्य भाषेत व्यक्त झाले. या दरम्यान सोशल मीडियावर व्यक्त होताना पातळी कशी सोडली जाते? हे या ट्रोलर्सकडून पाहायला मिळाले. यावर इंझमाम-उल-हक म्हणाला की, विराटच्या मुलीला धमकी देण्याचे वृत्त माझ्या कानावर आले. हा एक खेळ आहे, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. तुम्हाला विराट कोहलीवर टीका करू शकतात. परंतु, त्याच्या कुटुंबियाला लक्ष्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. प्रत्येकाने मर्यादेत राहावे, असाही इशारा त्यांनी दिलाय.
"न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात भारतीय संघ स्ट्राईक बदलण्यासाठी धडपड करताना दिसला. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यानंतरचा हा सर्वात महत्वाचा सामना होता. भारतीय संघ इतक्या दबावात कसा खेळू शकतो. भारताला मी पहिल्यांदाच अशा पद्धतीने खेळताना पाहिले. न्यूझीलंडचे दोन्ही फिरकीपटू चांगले आहेत. परंतु, त्यापैकी कोणीही जागतिक दर्जाचे फिरकीपटू नाहीत. मात्र, त्यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघ डगमगताना दिसला. एवढेच नव्हेतर, विराट कोहलीही स्ट्राईक बदलण्यासाठी धडपड करत होता. हे पाहून मला आर्श्चयाचा धक्का बसला", असे इंझमाम म्हणाला आहे.
इंझमाम पुढे म्हणाला की, या स्पर्धेत 8-10 संघ आहेत. यापैकी केवळ 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. एखादा संघ पराभूत झाला म्हणजे, त्यावर राग व्यक्त करणे एकमेव पर्याय नाही. ज्या प्रकारे आपण विजयाचा आनंद साजरा करतो. त्याचप्रकारे पराभव देखील पचवता आला पाहिजे.