T20 World Cup 2021: न्यूझीलंड विरुद्ध काल खेळण्यात आलेल्या सामन्यात  (IND Vs NZ) भारताला 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताचे टी-20 विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले. एखादा चमत्कारच भारताला टी-20 विश्वचषकातच्या उपांत्य फेरीत पोहचवू शकतो. यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारताला चांगली कामगिरी बजावता आली नाही. ज्यामुळे भारतीय संघातील खेळाडूबाबत अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातायेत. यातच न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात भारताचा पराभव झाल्याने माजी क्रिकेटर सुनिल गावस्कर यांनीही संताप व्यक्त केलाय. 


5 Reasons of for Team India Defeat : टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव; 'या' 5 चुका कारणीभूत


"न्यूझीलंड विरुद्ध काल खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने फलंदाजीच्या क्रमात अनेक बदल केले. या सामन्यात भारताचा सलामीवीर लोकेश राहुलसोबत ईशान किशानला पाठवण्यात आले. रोहित शर्मा हा उत्तम फलंदाज आहे. त्याला तिसऱ्या क्रमांकावर का पाठवण्यात आले नाही?" असा प्रश्न सुनील गावस्कर यांनी उपस्थित केला. "ईशान किशनसारख्या युवा खेळाडूला डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी द्यायला नको होती. त्याने 8 बॉल खेळून 4 धावा केल्या." 


यापुढे सुनिल गावस्कर म्हणाले की, "भारताच्या मनात पराभवाची भिती होती की नाही? याची मला कल्पना नाही. परंतु, न्यूझीलंड विरुद्ध भारताने फलंदाजीच्या क्रमात बदल केलेले अयोग्य ठरले.  रोहित शर्मा हा उत्तम फलंदाज आहे. त्याला केएल राहुलसोबत फलंदाजी करण्यासाठी पाठवणे आवश्यक होते. तसेच विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर खूप धावा केल्या. मात्र, तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला", असेही सुनिल गावस्कर यांनी म्हटलंय.


"ईशान किशन हा आक्रमक फलंदाज आहे. त्याला चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी पाठवायला हवं होतं. तो सामन्याच्या दृष्टीने खेळू शकतो. परंतु, भारतीय संघाने काय केलं? रोहित शर्माला ट्रेन्ट बोल्टच्या फलंदाजीवर खेळता येणार नाही, असा त्याला मॅसेज पाठवला. भारतासाठी गेल्या अनेक वर्षांपासून डावाची सुरुवात करणाऱ्या खेळाडूच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जातायेत, असा याचा अर्थ होतो" असेही गावस्कर यांनी म्हंटलंय.