T20 wolrd Cup 2022: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर काऊंटी क्रिकेट संघ लिस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळत आहे. त्यानंतर भारत इंग्लंडशी रिशेड्युल केलेला एकमेक कसोटी सामना खेळणार आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ कसा असेल? यावर विचारमंथन सुरु झालंय. अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ त्यांचे मत मांडत आहेत. याचदरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रविंद्र जाडेजाला आगामी टी-20 विश्वचषकाच्या टी-20 संघात स्थान मिळणं कठीण असल्याचं म्हटलंय. 


संजय मांजरेकर काय म्हणाले?
संजय मांजरेकर म्हणतात की, गेल्या काही दिवसांत दिनेश कार्तिकनं दाखवून दिले आहे की तो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर टीम इंडियासाठी चांगली फलंदाजी करू शकतो. अलीकडच्या काळात त्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये निर्माण केलेला प्रभाव अभूतपूर्व आहे. रवींद्र जाडेजासारख्या अष्टपैलू खेळाडूला टी-20 संघात स्थान मिळणं कठीण आहे. तर अक्षर पटेलसारखा खेळाडू त्यात पुढं जाऊ शकतो. हार्दिक पांड्याही संघात परतलाय. दिनेश कार्तिकसोबत मधल्या फळीत ऋषभ पंतही आहे. पण रवींद्र जडेजाही सहजासहजी संघातील जागा सोडणार नाही", असंही त्यांनी म्हटलंय. 


आयपीएल 2022 मध्ये रवींद्र जाडेजाच्या खराब कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रविंद्र जाडेजाला काही खास कामगिरी करता आली नाही. या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं त्याच्याकडं चेन्नईच्या संघाचं कर्णधारपद सोपवलं होतं.  परंतु, त्याच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाला आठ पैक सात सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर जाडेजानं पुन्हा धोनीकडं चेन्नईच्या कर्णधारपद सोपवलं. दरम्यान, फलंदाजी किंवा गोलंदाजीनंही चमक दाखवता आली नाही. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात त्याला दुखापत झाली आणि तो आयपीएल 2022 मधून बाहेर पडला. 


महत्वाचं म्हणजे, ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक होणार आहे, त्याआधी भारताला अनेक टी-20 सामने आणि मालिका खेळायच्या आहेत. विश्वचषकासाठी भारतीय संघ कसा असेल याची झलक इंग्लंड दौऱ्यातून पाहायला मिळेल.


हे देखील वाचा-