T20 WC 2021 Update: न्यूझीलंड (NZ) संघाला T20 विश्वचषक (T20 WC) मध्ये मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) तांत्रिक समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्या जागी अॅडम मिल्नेचा (Adam Milne) 15 सदस्यीय संघात समावेश केला जाईल. न्यूझीलंड क्रिकेट (NZC) नुसार, 30 वर्षीय फर्ग्युसनला सोमवारी रात्री सरावानंतर उजव्या नडगीला दुखापत झाली. यानंतर एमआरआय स्कॅन करण्यात आला, ज्यामध्ये दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. बोर्डाच्या म्हणण्यानुसार फर्ग्युसनला दुखापतीतून सावरण्यासाठी तीन ते चार आठवडे लागतील.


न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, "लॉकी फर्ग्युसनसाठी स्पर्धेच्या पूर्वसंध्येला असे घडणे निराशाजनक आहे आणि या क्षणी संपूर्ण संघ त्याच्यासाठी निराश आहे. तो आमच्या T20 संघाचा महत्त्वाचा भाग आहे आणि तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता, त्यामुळे यावेळी त्याला गमावणे हा मोठा धक्का आहे." न्यूझीलंडला पुढील 13 दिवसांत पाच सामने खेळायचे आहेत. प्रशिक्षकाच्या मते, अशा स्थितीत फर्ग्युसनला स्पर्धेतून बाहेर काढण्याशिवाय संघाकडे पर्याय नव्हता. ते म्हणाले, गेल्या दोन आठवड्यांपासून संघासोबत सराव करत असलेल्या अॅडम मिल्नेच्या रुपात पर्याय मिळाल्याने आम्ही भाग्यवान आहोत.


न्यूझीलंडने दुखापतीच्या बाबतीत कव्हर म्हणून त्याचा संघात समावेश केल्यामुळे मिल्ने यूएईमध्ये उपस्थित आहे. मात्र, आयसीसीकडून मंजुरी मिळाल्यानंतरच तो उपलब्ध होईल. न्यूझीलंडचा संघ 31 ऑक्टोबरला भारताविरुद्ध खेळणार आहे. अशा स्थितीत संघासाठी चांगल्या फॉर्मात असलेल्या फर्ग्युसनला वगळणे हा मोठा धक्का आहे. फर्ग्युसन आणि मिल्ने दोघेही कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्ससाठी UAE मध्ये खेळल्या गेलेल्या IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी झाले होते. फर्ग्युसनने नाइट रायडर्ससाठी आठ सामने खेळले, ज्यात एलिमिनेटर, दुसरा क्वालिफायर आणि फायनलचा समावेश आहे. दुसरीकडे मिल्नेने मुंबईसाठी केवळ तीन सामने खेळले.


फर्ग्युसनने उत्कृष्ट गोलंदाजी करताना अनेक बळी घेत नाइट रायडर्सची अंतिम फेरी गाठण्यात मोलाचा वाटा उचलला. मात्र, चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात त्याची गोलंदाजी चांगली राहिली नाही. त्याने चार षटकात 56 धावा दिल्या, तर यापूर्वीच्या सात सामन्यांमध्ये त्याने फक्त एकदाच 30 पेक्षा जास्त धावा दिल्या होत्या.