Paris Olympics 2024 Maharashtra Athletes Swapnil Kusale: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने (Swapnil Kusale) 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावलं.
भारत देशाचा झेंडा फडकला, त्याचा मला अभिमान आहे, असं स्वप्नील कुसाळेच्या आईने सांगितले. तसेच स्वप्नीलचे वडील म्हणाले की, माझा विश्वास होता, की तो पदक जिंकणारचं...आज मला खूप अभिमान आहे. आपल्या देशाने त्याने बहुमान मिळवून दिला, असं स्वप्नीलचे वडील म्हणाले. स्वप्नीलच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांच्या प्रती असलेली श्रद्धा खूप आहे. तो त्यांना आईसमान मानतो..तो खूप भावनिक आहे..जी मुलं भावनिक असतात ती कधीच कुठे कमी पडत नाही, असं स्वप्नीलचे वडील म्हणाले. यावेळी माध्यमांशी बोलताना स्वप्नीलचे कुटिंबिय भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, कुस्तीपटू खाशाबा जाधव हे भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्रातील पहिले खेळाडू ठरले होते. त्यांनी 1952 साली ही कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर 72 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना भारतासाठी पदक मिळवून देण्यात अपयश आलं होतं.
कोण आहे स्वप्नील कुसाळे-
नेमबाज स्वप्नील कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे. 6 ऑगस्ट 1995 मध्ये जन्मलेल्या स्वप्नीलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे. अभिनव बिंद्राला 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने 12वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.
स्वप्नील कुसाळे मध्य रेल्वेत कार्यरत-
स्वप्नील कुसाळे हे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे एमएस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. भारताचा हा नेमबाज महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे. स्वप्नील म्हणतो की त्याने एमएस धोनीचा बायोपिक अनेकदा पाहिला आहे आणि धोनीच्या कामगिरीपासून मी प्रेरणा घेतली आहे. धोनी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, तर शूटिंगसाठी देखील शांत आणि संयमशील स्वभावाची आवश्यकता असते.
संबंधित बातमी:
संबंधित व्हिडीओ-