Suryakumar Yadav, Ind vs Sl : टीम इंडियानं (Team India) श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 नं जिंकली. शनिवारी (7 जानेवारी) राजकोट येथे झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघानं श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला. भारतानं श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचं लक्ष्य दिलं होतं. परंतु, श्रीलंकेचा संपूर्ण संघ केवळ 137 धावांत गारद झाला. दोन्ही संघांमध्ये आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून त्यातील पहिला सामना 10 जानेवारी रोजी होणार आहे.
टीम इंडियानं राजकोटच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात श्रीलंकेचा 91 धावांनी धुव्वा उडवला. तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव. मुंबईच्या सूर्यकुमार यादवनं झळकावलेल्या नाबाद शतकानं टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्यानं 51 चेंडूंत सात चौकार आणि नऊ षटकारांसह नाबाद 112 धावांची खेळी उभारली. सूर्यकुमार यादवचं ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमधलं हे तिसरं शतक ठरलं.
इंग्लंड अन् न्यूझीलंडमध्येही झळकावलेलं शतक
सूर्यकुमार यादवनं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं शतक गेल्या वर्षी जुलैमध्ये नॉटिंगहॅमच्या मैदानावर झळकावलं होतं. त्यानंतर त्यानं इंग्लंडविरुद्ध 117 धावांची खेळी खेळली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये, सूर्यकुमार यादवनं न्यूझीलंडविरुद्ध माऊंट मौनगानुई येथे नाबाद 111 धावांची खेळी केली. म्हणजेच, सूर्यकुमारने आधी इंग्लंडमध्ये, नंतर न्यूझीलंडमध्ये आणि आता आपल्या घरच्या मैदानावर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावलं आहे. सूर्यकुमार यादव सध्या ICC T20 क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आहे.
मॅक्सवेलशी साधली बरोबरी
सूर्यकुमार यादवनं श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून विक्रमांची मालिका केली आहे. सूर्या हा अशा पाच फलंदाजांपैकी एक आहे, ज्यांच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन किंवा त्याहून अधिक शतक आहेत. या यादीत रोहित शर्मा चार शतकांसह आघाडीवर आहे. यानंतर सूर्यकुमार यादव (3), ग्लेन मॅक्सवेल (3), कॉलिन मुनरो (3) आणि सबावून द्विजी (3) यांचा क्रमांक लागतो. तसेच, सूर्यकुमार हा ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनंतर तीन वेगवेगळ्या देशांमध्ये T20 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणारा जगातील दुसरा फलंदाज आहे.
श्रीलंकेविरुद्ध टी-20 मध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. रोहित शर्मानं यापूर्वी ही कामगिरी केली होती. रोहितनं 2017 मध्ये इंदूरमध्ये 43 चेंडूत 118 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवनं 45 चेंडूत शतक झळकावलं आहे. सूर्यानं झळकावलेलं हे शतक टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारतीय फलंदाजाचं दुसरं सर्वात वेगवान शतक आहे. या बाबतीत कर्णधार रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मानं 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावलं होतं.
टीम इंडियाकडून सर्वात वेगवान टी20 शतकं
35 चेंडूत, रोहित शर्मानं श्रीलंकेविरोधात झळकावलं (2017)
45 चेंडूत, सूर्यकुमार यादवनं श्रीलंकेविरोधात जळकावलं (2023)
46 चेंडूत, केएल राहुलनं वेस्टइंडीज विरोधात झळकावलं (2016)
48 चेंडूत, सूर्यकुमार यादवनं इंग्लंडविरोधात झळकावलं (2022)
49 चेंडूत, सूर्यकुमार यादवनं न्यूझीलंडविरोधात झळकावलं (20220
सूर्यकुमारची बात काही औरच...
32 वर्षीय सूर्यकुमार यादव मैदानात उतरताच ज्या पद्धतीनं फलंदाजीला सुरुवात करतो, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सची आठवण आल्याशिवाय राहत नाही. राजकोटच्या मैदानावरही सूर्यानं श्रीलंकेच्या गोलंदाजांना चारी मुंड्या चीत करत तुफान फटकेबाजी केली. सूर्यकुमार नावाचं वादळ मैदानात उतरल्यानंतर त्याला रोखताना भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटतो.
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधित शतकं
- 4 रोहित शर्मा (भारत)
- 3 सूर्यकुमार यादव (भारत)
- 3 ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
- 3 कॉलिन मुनरो (न्यूझीलंड)
2022 मध्ये, सूर्यकुमार यादवनं एकूण 31 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 1164 धावा केल्यात. ज्यात 2 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. एका कॅलेंडर वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजानं 1000 धावा पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ होती. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकातही सूर्याची कामगिरी उत्कृष्ट होती. सूर्यानं 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत 59.75 च्या सरासरीनं 239 धावा केल्या, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Suryakumar Yadav : 7 चौकार अन् 9 षटकार, राजकोटमध्ये सूर्यादादाची कमाल,शतक ठोकत रचला इतिहास